सोलापूर : वॉटर ऑडिटमधून बोगस नळांचा सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

सोलापूर : वॉटर ऑडिटमधून बोगस नळांचा सर्व्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या वॉटर ऑडिटच्या माध्यमातून एका कुटुंबाकडून ८८ प्रकारची माहिती संकलित करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने दूषित पाणीपुरवठा व बोगस नळ, पाण्याचे मुख्य स्त्रोत, प्रशासनाकडून होणारा पाणीपुरवठा यासह लोकसंख्येची गणना करण्यात येत आहे. अडीच महिन्यात ६६ हजार ६५२ घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्व्हेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरातील प्रत्येक कुटुंबाची परिपूर्ण माहिती भरून घेण्याचे काम या ऑडिटच्या माध्यमातून होत आहे. यासाठी पेठनिहाय ११० कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्‍ती केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर वॉटर ऑडिटचे ॲप दिले असून, या ॲपद्वारे प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येत आहे. नाव, गाव, पत्ता, कुटुंबसंख्या व वयोगट, जात, शिक्षण, मिळकत कर, बांधकाम परवानगी, वास्तवाचे वर्ष, पाण्याचा वापर, पाणी स्वच्छ की अस्वच्छ, महापालिकेचा नळ की बोअरवेल आदी ८८ प्रकारची माहिती भरून घेण्याचे काम सुरू आहे. शहरात एकूण मिळकतींची संख्या ही १ लाख ६० हजार इतकी असली तरी हद्दवाढ भागात एका मिळकतींमध्ये तीन-चार भाडेकरु वास्तव्यास आहेत. त्यातच शहरात साधारण १ हजार ५०० किलोमीटर अंतरावर पाणीलाईन घातली आहे. आता टॅंकरमुक्‍ती योजनेतून हद्दवाढ भागात जलवाहिनी टाकून बऱ्याच ठिकाणचा टॅंकर बंद करण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी, पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन हद्दवाढसह शहराचा समतोल विकास साधण्यासाठी हे ऑडिट अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. शहरवासियांचा बेसिक डाटा संकलित करून, त्यांच्या समस्यांचे कायमस्वरुपी निराकरण करण्यासाठी किमान मुलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी हे ऑडिट महत्त्वाचे आहे. काही ठराविक भाग वगळता नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

सर्व्हेतून हे साध्य होणार

  • शहराची प्रतिदिवसा पाण्याची गरज

  • अशुध्द पाणीपुरवठा होणारा परिसर

  • बोगस नळ कनेक्‍शनची संख्या

  • एकूण मिळकतींची संख्या व शहरातील लोकसंख्या

  • शहराचा सर्वांगिण विकासाचा मोजमाप आराखडा

"शहरातील वॉटर ऑडिटला नागरिकांचा प्रतिसाद आहे. आणखी उत्तमरित्या प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे. दररोज दोन ते अडीच हजार मिळकतींचे वॉटर ऑडिट होत आहे. हे ऑडिट नागरिकांसह प्रशासनाच्या हिताचे आहे. आतापर्यंत शहरातील ६६ हजार ५६२ मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. अद्यापही एक लाख मिळकतींचा सर्व्हे अपूर्ण आहे. तेही लवकरात लवकर होण्यासाठी नागरिकांची सहकार्य करावे."

- विक्रम पवार, सहाय्यक आयुक्‍त, सोलापूर महापालिका

loading image
go to top