
सोलापूर : बेभरवशा ‘सिग्नल’वर शहरातील वाहतूक
सोलापूर : शहरातील वाहतूक शाखेची अवस्था ‘नाव मोठे लक्षण खोटे'' अशी झाली आहे. वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर असताना सध्या शहरातील वाहतूक बेभरवशा सिग्नलवर सुरू आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी केवळ ई-चलन करून कारवाईचा आकडा वाढविण्यात व्यस्त असल्याचे चित्र शहरातील चौकाचौकांमध्ये दिसून येत आहे.
शहरातील चौका-चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे राहून वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो काढण्याचा वाहतूक पोलिसांचा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या शाखेस सध्या मुख्य कामाचा विसर पडला असून, दिवसभर केवळ दंडात्मक कारवाईवर जोर असून, कर्मचारी वाहतुकीला शिस्त न लावता दंड आकारण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र शहरातील प्रत्येक चौकात पाहायला मिळत आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असताना चौका-चौकांमध्ये रिक्षा, बेकादेशीर टपऱ्या व वाहने थांबविण्यात आल्याने वाहने चालविताना वाहन चालकांचा आणि विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
शहरातील सिग्नल जवळच वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे सिग्नल परिसरच बेशिस्त असल्याची स्थिती आहे. त्यातच नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शहरात प्रवेश करतानाच वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि शहरातील इतर अंतर्गत रस्त्यावर कुठेही आणि कसेही वाहने उभी केलेली असतात. मात्र हे पाहण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना कदापी वेळ मिळत नाही. मात्र ई-चलन करून दिवसभरातील कारवाईचा आकडा वाढविण्यात आणि वरिष्ठांकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी शाखेतील अधिकारी, कर्मचारी सध्या व्यस्त आहेत.
येथे आहेत सिग्नल
भैय्या चौक, आम्रपाली चौक, वोडाफोन गॅलरी, जुना बोरामणी नाका, जुना अक्कलकोट नाका, अशोक चौक, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, पत्रकार भवन, गांधी नगर चौक, रंगभवन चौक, गुरुनानक चौक, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, आसरा चौक, सरस्वती चौक, सिव्हील चौक येथे सिग्नल आहेत.
अपघाताचा धोका वाढला
शहरातील वाहतूक केवळ सिग्नलच्या भरवशावर सुरू आहे. याठिकाणी होणारी वाहनधारकांची शर्यत रोखणार कोण, असा प्रश्न आता समोर येत आहे. बहुतांश वाहनधारक सिग्नलचे नियम पाळतात तर काही वाहनचालक सिग्नलचे नियम मोडून वाहने घेवून निघून जातात. यामुळे नियमभंग होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.
वाहतूक शाखेचा लेखाजोखा
पोलिस निरीक्षक
सहाय्यक पोलिस निरीक्षक
Web Title: Solapur Traffic Signals City On Unreliable
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..