
सोलापूर : पुण्याला जायचंय, तर मोजा साडेपाचशे रुपये!
सोलापूर: उन्हाळा सुटीत शहर व जिल्ह्यातील प्रवासी बाहेरगावी पर्यटनासाठी आणि आपल्या नातेवाइकांकडे जातात. चार-पाच महिने आधीच तिकिटे देखील बुक करतात. मात्र सोलापूर रेल्वे विभागाने अचानक अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्याने सोलापूर- पुणे १२० रुपयांमध्ये होणारा प्रवास दुपटीने वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी बसचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेच्या तुलनेत एसटी बसचे आणि खसगी ट्रॅव्हल्सचे तिकीटदर जास्त असल्याने याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच एसटीने पुणे गाठण्यासाठी सहा तास लागत असल्याने वेळही वाया जात आहे.
शिक्षण, नोकरी, व्यापार आणि हॉस्पिटलच्या कामासाठी सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सोलापुरातून पुणे, मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची उत्तम सोय आहे. परंतु आता मेगा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. मागील तीन-चार महिन्यांत मेगा ब्लॉक घेतल्यामुळे अनेकांना प्रवास रद्द करण्याचा अनुभव आला आहे. मात्र एसटी आणि खासगी वाहनांना तिकीटदर जादा असल्याने ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही. सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी तिकीट आरक्षित करून हुतात्मा एक्स्प्रेसला केवळ १२० रुपये मोजावे लागतात तर साध्या एसटीने याच प्रवासासाठी ४०० तर शिवशाहीने ५५५ रुपये लागतात.
यात प्रवाशांना २८० ते ४३५ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. रेल्वे रद्द केल्याने साहजिकच एसटीने आणि ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. मात्र एसटी महामंडळाच्या ६०० प्रवासी गाड्या धावत आहेत. सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर विभागाच्या ४५ तर इतर विभागाच्या २५ अशा एकूण ७० गाड्या धावत आहेत. प्रवासी तीन-चार महिने अगोदरच आपल्या प्रवासाचे तिकीट बुक करून ठेवतात. प्रवासाचे सर्व नियोजन झालेले असते आणि ऐनवेळी गाडी रद्द झाल्याचा मेसेज रेल्वे प्रशासनाकडून मिळतो. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या वेळेचा विचार करणार की नाही, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
सोलापूर-पुणे ४०० ते ५५५ ४००
सोलापूर-मुंबई ८३५ ८००
सोलापूर-नागपूर ६०० १४००
सोलापूर-कोल्हापूर ४०० ३८०
सोलापूर-नांदेड ५९५ १०००
हॉस्पिटलच्या कामासाठी मला आईसोबत दर पंधरा दिवसाला पुणे येथे जावे लागते. पंधरा दिवसांपूर्वीच मी दोघांचेही हुतात्मा एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षित केले होते. मात्र अचानक तिकीट रद्दचा मेसेज मोबाईलवर आला. जलद, आरामदायी आणि कमी खर्चातील प्रवासासाठी रेल्वे हा चांगला पर्याय आहे. मात्र याची आता शाश्वती राहिली नाही. एसटीने प्रवास करणे मला परवडणारे नाही.
- वेणुगोपाल नक्का, प्रवासी
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात येऊ नये. कारण, या गाडीने स्थानिक प्रवासी प्रवास करतात. इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करून त्याच धर्तीवर हुतात्मा एक्स्प्रेस चालवावी. कुर्डुवाडी, मिरजमार्गे ती पुणे येथे पाठवावी व त्याच मार्गाने सोलापूरला आणावी. तिकीट भाडे जास्त असेल तरी चालेल. हा प्रयत्न रेल्वे प्रशासनाला करणे शक्य आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर
Web Title: Solapur Travels St Time Consuming
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..