Solapur News : उजनीतून शहरासाठी गुरुवारपासून सुटणार पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी

सोलापूर : उजनीतून शहरासाठी गुरुवारपासून सुटणार पाणी

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात सध्या आठ फुटांपर्यंतच पाणी आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने बंधाऱ्यातील पाण्याने तळ गाठला आहे. शहराचा पाणीपुरवठा अजूनही विस्कळितच असून दररोज बंधाऱ्यातील अर्धा फूट पाणी कमी होऊ लागले आहे. उजनीतून शहरासाठी पाणी सोडण्यास आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मान्यता दिली. त्यामुळे दोन दिवसांनी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे.

उजनी धरण सध्या मायनस तीन टीएमसीपर्यंत खाली गेले आहे. ७ जूनपासून चांगला पाऊस होईल, अशी आशा असतानाही अजूनही धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुसरीकडे सोलापूर शहरातही मोठा पाऊस झाला नसल्याने पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यानेही तळ गाठला आहे. आता आठ-दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा औज बंधाऱ्यात आहे. बंधाऱ्यातील पाणीसाठा दररोज अर्ध्या टक्क्यांनी कमी होत आहे. धरणातून पाणी औज बंधाऱ्यात यायला किमान आठ-दहा दिवस लागतात. त्यामुळे पुढील दोन दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास गुरुवारी (ता. १६) धरणातून पाणी सोडले जाणार आहे. पण, पाऊस लांबल्याने धरण मायनसमध्ये गेल्याने आणि शहराला पावसाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडण्यास कालवा सल्लागार समितीची मान्यता नसल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव जलसंपदा अधिकाऱ्यांनी पालकमंत्री भरणे यांच्याकडे पाठविला होता. त्याला पालकमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली असून आता शहराला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समांतर जलवाहिनी होणार कधी?

सोलापूर ते उजनी ११० किलोमीटरची पाईलपाईन दीड-दोन वर्षांत होईल, अशा बाता सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केल्या. त्यानंतर त्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले. पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत विरोधकांसह सत्ताधारी भाजपनेही शहरवासियांना एक दिवसाआड किंवा दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून तो प्रश्न सुटेल, असा सोलापूकरांना विश्वास होता. पण, अजूनही समांतर जलवाहिनी रखडलेलीच आहे. त्यामुळे शहराला चार ते सहा दिवसाआड पाणी मिळत असल्याची स्थिती आहे.

Web Title: Solapur Ujani Reservoir Water Eleased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top