
कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाचा ग्रेड वाढला.
सोलापूर विद्यापीठाला 'नॅक'चे 'बी ++' मानांकन!
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला (Solapur University) 'नॅक'कडून 'बी ++' असे मानांकन मिळाले आहे. पूर्वी विद्यापीठाचे ग्रेड 'बी' होते. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (Dr. Mrinalini Fadnavis) यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाचा ग्रेड वाढला. परंतु, 'ए' ग्रेड मिळेल ही अपेक्षापूर्ती झाली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून आता प्राप्त मूल्यांकनास बंगळुरु येथील 'नॅक'कडे (NACC) आव्हान देणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.(Solapur University Gets B++ Grade from NAAC)
हेही वाचा: परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ
पारंपारिक शिक्षणाला जोड म्हणून विद्यापीठाने व्यावसायिक व कौशल्य विकासाच्या सर्टिफिकेट कोर्सेस जोड दिली. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने केलेली कामगिरी नॅक कमिटीला अतिशय भावली. शहरातील अभ्यासिका, विद्यापीठाचा ग्रामीण भागाशी संपर्क, विद्यापीठातील ग्रीन कॅम्पस, कौशल्य विकासाचे विविध कोर्सेस, संशोधनातील विद्यापीठाचे योगदान, या सर्व बाबी नॅक कमिटीला खूप भावल्या. एसएसआर व डीव्हीपी बंगळुरु येथील नॅक कार्यालयाच्या वतीने विद्यापीठाचे मूल्यांकन झाले. 20 जानेवारीपासून चार दिवस हे मूल्यांकन पार पडले. केरळ येथील कन्नूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. के. अब्दुलकादर यांच्या नेतृत्वाखालील समितीने विद्यापीठाचे मूल्यांकन केले. विद्यापीठाला निश्चितपणे 'ए' ग्रेड मिळेल, असा विश्वास प्रशासनाला होता. पाच वर्षांपूर्वी विद्यापीठाला 'बी' ग्रेड मिळाला होता. ग्रेड वाढल्यानंतर रुसा व शासकीय अनुदानात मोठी वाढ होते आणि विद्यापीठाच्या विकासासाठी तो निधी वापरता येतो. मात्र, अपेक्षित ग्रेड न मिळाल्याने आणि काही गुणांनी 'ए' ग्रेडची संधी हुकल्याने त्याला आव्हान देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. दोन दिवसांत गुणांकनाची सविस्तर माहिती नॅक कमिटीकडून विद्यापीठाला प्राप्त होईल. त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा: सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी 523 निवेदने
0.05 गुणांनी हुकली संधी
विद्यापीठाला 'ए' ग्रेड मिळण्यासाठी 3.01 गुण आवश्यक होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने उत्तम प्रगती साधली आहे. त्यांनी विविध बाबींवर उत्कृष्ट काम केल्याचे कौतुकही नॅक कमिटीने केले होते. मात्र, विद्यापीठाला 2.96 गुण मिळाले आणि 'ए' ग्रेडची संधी 0.05 ने हुकली. प्राप्त निकालाला 15 दिवसांत आव्हान देता येऊ शकते. या पार्श्वभूमीवर मूल्यांकनाला आव्हान देण्यासंदर्भात आज (सोमवारी) कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निर्णय होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
Web Title: Solapur University Gets Grade From Naac
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..