esakal | Solapur: ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलराव शिंदे factory

टेंभुर्णी : ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेंभुर्णी : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील एफआरपीची उर्वरित रक्कम प्रतिटन १७६.९८ रूपयांप्रमाणे बॅंक खात्यावर जमा केली असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी दिलेली आहे. १० ऑक्‍टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पिंपळनेर येथील युनिट नंबर एक तर करकंब येथील युनिट नंबर दोनमध्ये दुपारी चार वाजता उसाची मोळी टाकण्यात येणार असून शासन आदेशानुसार १५ ऑक्‍टोबरपासून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ होणार असल्याची माहिती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार साखर आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, या हंगामामध्ये पिंपळनेर युनिट वीस लाख टन व करकंब येथील युनिट पाच लाख टन, असे एकूण ४५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप तसेच पिंपळनेर युनिटमधून साडेनऊ कोटी व करकंब युनिटमधून साडेतीन कोटी युनिट वीज निर्यातीचे उद्दिष्ट ठरविले आहे. ज्यूस टू इथेनॉल २ कोटी ५२ लाख लिटर व बी हेव्ही मोलॅसेसपासून २ कोटी लिटर असे एकूण साडेचार कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्याकरिता डिस्टलरी प्रकल्प ३०० दिवस कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट नंबर दोनचे जनरल मॅनेजर एस आर. यादव, केन मॅनेजर एस. पी. थिटे उपस्थित होते.

हेही वाचा: येवल्यात सहा महिन्यांत फक्त ३८ हजार नागरिकांचे लसीकरण

अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षीस व बोनस

मागील गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ दिवसाचा पगार बक्षीस म्हणून तसेच दिवाळीच्या सणासाठी ८.३३ टक्के प्रमाणे बोनस देण्यात येणार आहे. २०२१-२२ या हंगामामध्ये ऊस तोडणी यंत्रणा सज्ज असून वाढीव डिझेल दराचा फरक वाहतूकदारांना देण्यासंदर्भात संचालक मंडळ विचाराधीन आहे.

एफआरपीची रक्कम १०० टक्के अदा

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची २०२०-२१ हंगामाची २३७६.९८ रूपये प्रतिटन एफआरपी असून साखर कारखान्याने यापूर्वी २२०० रूपये प्रतिटनप्रमाणे पिंपळनेर युनिटमध्ये गाळप झालेल्या १५ लाख १ हजार ८४४ मेट्रीकटन उसाचे ३३० कोटी ४० लाख रुपये व करकंब येथील युनिटमध्ये गाळप झालेल्या ३ लाख ८३ हजार ५३८ मेट्रिक टन ऊसाचे ८४ कोटी ३७ लाख रुपये असे एकूण ४१४ कोटी ७८ लाख रुपये ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा केले आहेत. एफआरपीची उर्वरित १७६.९८ रूपये प्रतिटन प्रमाणे पिंपळनेर युनिट ( २६ कोटी ५८ लाख) करकंब युनिट (६ कोटी ७८ लाख रूपये) असे एकूण ३३ कोटी ३६ लाख रुपये ३० सप्टेंबरपूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ४४८ कोटी १४ लाख रुपये एवढी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे.

loading image
go to top