अध्यक्ष म्हणाले, सर्वांसाठीच चाललय; शिंदे म्हणाले, आमचा वाटा कुठाय?

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली
solapur zilla parishad
solapur zilla parishadsakal media

सोलापूर : एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्य सरकार सुमोटो गुन्हा दाखल करु शकते तर, जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते हे त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? झेडपीने त्यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही?, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार का दिली नाही? असे प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी आज उपस्थित केले. टक्केवारी नेमकी कोणासाठी गोळा केली जात होती असे त्यांनी विचारताच जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे म्हणाले, हे सर्वांसाठीच चाललयं, तेवढ्यात जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी आमचा वाटा कुठे आहे? असे विचारले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी अध्यक्ष कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती विजयराज डोंगरे, सभापती अनिल मोटे, सभापती संगिता धांडोरे उपस्थित होते. सभा सुरु होण्यापूर्वीच सदस्य उमेश पाटील यांनी झेडपी अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांच्या टक्केवारीचा विषय उपस्थित केला. सभापतींना टक्केवारी मागणाऱ्या स्वीय सहाय्यकाला आतापर्यंत का निलंबित केले नाही? असा प्रश्‍नही उमेश पाटील यांनी विचारला. सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, याप्रकरणात मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची तुमच्यापेक्षा माझी जास्त इच्छा आहे. मोहिते यांची तत्काळ बदली करतो. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसवर त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. अध्यक्ष कांबळे म्हणाले, याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी एकही रुपाया घेतलेला नाही.

उमेश पाटील यांनी आरोप करताना जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीत सदस्य खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरला गेला असल्याचा आरोप केला. या आरोपावर भाजपचे सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, अण्णाराव बाराचारे, सुभाष माने, अतुल पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर सदस्य खरेदीचा मुद्दा उमेश पाटील यांनी मागे घेतला.

मोहितेंना २८ ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत

जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ११ ऑक्‍टोबरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २१ ऑक्‍टोबर रोजी मोहिते यांनी ही नोटीस समक्ष स्वीकारली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांनी खुलासा देणे अपेक्षित आहे. मोहिते यांच्याकडून २८ ऑक्‍टोबरपर्यंत खुलासा येणे अपेक्षित असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली.

"जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर आज चर्चा झाली. या चर्चेतून जो निर्णय मला अपेक्षित होता, तो न झाल्याने मी या प्रकरणाची तक्रार आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार आहे. या प्रकरणावर आजच्या सभेतून ठोस निर्णय अपेक्षित होता. तो निर्णय झालेला नाही."

- अनिल मोटे, कृषी सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com