पोटाच्या खळग्यासाठी आजीचा संघर्ष 

Sonabi
Sonabi

सोलापूर : भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही. टीचभर पोटासाठी ढोरकष्ट करणारी अनेक माणसं आपल्या अवतीभवती असताताच. काही माणसं तर केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. ऊन, वारा आणि थंडीची तमा न बाळगता सध्या सरत्या वयात काम करतच तीन दगडांची चूल मांडून रामवाडी येथे सोनाबाई जयदेव गायकवाड या आजी पोटाची खळगी भागवीत आहेत. 
सोनाबाई गायकवाड यांचे वय 70च्या आसपास आहे. बांधकाम कामगार म्हणून 50 वर्षांपासून त्या काम करत आहेत. या आजींना केवळ दोन वेळेच्या घासाची चिंता सतावत आहे. त्यांना शरीराची व्यवस्थित साथ मिळत नसूनही त्या आजही राबत आहेत. त्यांच्यासोबत घरात त्यांचा नातू अक्षय राहतो. अक्षय मानसिक आजाराने त्रस्त झाला असल्यामुळे त्याला आजी सांभाळत आहेत. आजीचे घर रामवाडी येथे आहे. कामासाठी त्या शहरातील अनेक ठिकाणी फिरतात. कोणत्या ठिकाणी काम निघेल तिथे त्या पोचतात, परंतु जवळ पुरेसा पैसा नसल्यामुळे आजही त्या पायी चालतच आपला प्रवास करत आहेत. यावर "तेच पैसे दुसऱ्या कामी येतील म्हणून राखून ठेवते', अशा या आजी म्हणाल्या. 
बांधकामच्या ठिकाणी वाळू चाळणे, पोते भरणे, माल उचलणे आणि विटा उचलणे असे काम त्या करतात. सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काम करत आहेत. कामासाठी त्यांना घरातून चालत निघावे लागते. त्यामुळे सकाळी आठ वाजता घर सोडतात आणि सायंकाळी घरी जाण्यास आठ वाजतात. 
आजींचे कष्ट संपता संपेना, त्यांच्या चेहऱ्यावरील दु:ख न झाकण्यासारखे असेच आहे. स्वत:चा आणि नातवाचा डोलारा त्यांच्या जिवावर तरला आहे, त्यांचे बांधकाम मजूर म्हणून सुरू असलेले जीवन प्रचंड संघर्षमयच आहे. जगण्यासाठी संघर्ष करताना अवघा प्रपंच या आजी सांभाळत आहेत. 
सोनाबाई आजीची व्यथा 
या वयात काम करताना लयं त्रास होत आहे, ताकत लावून काम करते. हात-पाय दुखतात, वाळूची टोपली उचलताना कंबर दुखते, पण कुणाला सांगू? या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि नातूसाठी काम करत आहे. म्या आजारी पडल्यावरही गोळी घेत नाय तेच पैकं खर्चाला येत्यात म्हणून जपून ठेवते. या साऱ्या गोष्टींचा लयं त्रास होतयं. पण मला कोण खाऊ घालणार... मला कुणाची साथ नाय... तो जगवेल तेवढं जगेल, बस बाकी सर्व त्याच्यावर सोडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com