
विद्यापीठीय कर्मचाऱ्यांचे 'काम बंद'! परीक्षा लांबणीवर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, वर्ग एक अधिकाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगानुसार (University Grants Commission) वेतन श्रेणी लागू करणे, 58 महिन्यांची वेतनातील थकबाकी देणे, यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. आंदोलनाचा चौथा दिवस असतानाही शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. (Students exams have been postponed due to agitation by university staff)
कर्मचाऱ्यांनी मंगळवारी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीकडून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना कळवूनही त्यांनी काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारले आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासनही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. या वेळी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन काशीद, उपाध्यक्ष नितीन मुंडफणे, महासंघाचे प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, सहसमन्व्यक सुनील थोरात, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, राष्ट्रीय सदस्य प्रशांत पुजारी, आनंद पवार, लक्ष्मण चिक्का, रूपाली हुंडेकरी, हरीश गारमपल्ली, श्रीशैल देशमुख, कास्ट्राईब (Castribe) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मालकारसिद्ध हैनाळकर, ऑफिसर फोरमचे (Officer Forum) डॉ. सूर्यकांत कांबळे, गिरीश कुलकर्णी, अनिल जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वसंत सपताळे, उपाध्यक्ष सीता नवगिरे आदी उपस्थित होते.
परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर
नोव्हेंबर महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच परीक्षा (Exams) तोंडावर असताना विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचारी मागण्यांबाबत ठाम आहेत. त्यामुळे ऑनलाइन सत्र परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कसा तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.