esakal | सुधाकरपंत परिचारक : अनेक संस्था, हजारो शेतकरी अन्‌ कर्मचाऱ्यांचा पोशिंदा 
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhakarpant Paricharak Messiah by hundreds of organizations thousands of farmers and employees

सर्वपक्षीय लोकांशी संबंध 
कै. वसंतदादा पाटील, कै. शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वजण पंतांकडे आदराने पहात. राजकीय मतभेद झाले तरी पण त्यांचे कोणाशी वैयक्तिक मतभेद झाले नाहीत. अखेरच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून त्यांनी भाजपचे काम केले. परंतु या काळात वर्षानुवर्षे एकत्र काम केलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंत्री, नेतेमंडळी पंढरपूरला आले तर त्यांना भेटण्यासाठी पंत आवर्जून विश्रामगृहात जात आणि त्यांचे पंढरपूरकर या नात्याने स्वागत करत. 

सुधाकरपंत परिचारक : अनेक संस्था, हजारो शेतकरी अन्‌ कर्मचाऱ्यांचा पोशिंदा 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून सुधाकरपंत परिचारक यांची ओळख होती. तब्बल 40 ते 50 वर्षे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने त्यांनी राज्यात मानाचे स्थान निर्माण केले होते. सर्वपक्षीय नेते मंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नेते त्यांचा आदेश मानत. ज्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात काही प्रश्न निर्माण होत, त्या वेळी सर्वांच्या मध्ये संवाद साधून नाते टिकवून ठेवणारा विश्वासार्ह दुवा म्हणून सुधाकरपंत आपली भूमिका बजावत. साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्थांचे मार्गदर्शक असलेल्या पंतांच्या अचानक जाण्याने शेकडो संस्था, हजारो शेतकरी आणि कर्मचारी पोरके झाले आहेत. 

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांची अचानक झालेली एक्‍झिट लाखो लोकांना चटका लावून गेली. आयुष्यभर तत्वाने काम करणारा अजातशत्रू नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने जिल्ह्यातील लाखो लोकांचे डोळे पाणावले. त्यांच्या निधनानंतर आता वीस दिवस उलटून गेले. परंतु आजही त्यांच्या कार्यकर्त्यांमधूनच नव्हे तर विरोधकांमधूनही हळहळ व्यक्त होताना दिसते. जिल्ह्याच्या राजकारणात पंतांच्या शब्दाला मान होता. सर्व पक्षातील नेते मंडळी आदराने त्यांना पंत, श्रीमंत, मालक अशा टोपणनावाने ओळखत. त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यात आता त्यांच्याप्रमाणे काम करणारी, सर्वांच्या मनात आदर असलेली व्यक्ती राहिली नसल्याची भावना व्यक्त होत आहे. तब्बल पंचवीस वर्षे आमदार राहिलेल्या पंतांनी पांडुरंग, भीमा, दामाजी आणि युटोपियन अशा अनेक साखर कारखान्यांना तसेच बाजार समित्या, जिल्हा बॅंक, पंढरपूर अर्बन बॅंकेसह अनेक सहकारी संस्थांना आपल्या नेतृत्वाने प्रगतीपथावर नेले. 

साधी राहणी आणि सहज संपर्क 
पंतांची राहणी पहिल्यापासून शेवटपर्यंत साधी होती. सुरुवातीच्या काळात सायकलवरून आणि त्यानंतर लुनावरून ते अनेक वर्षे गावात फिरत. त्यांचे वडील रामचंद्र परिचारक हे सुमारे 35 वर्षे पंढरपूर तालुक्‍यातील खर्डी गावचे सरपंच होते. काका दिवाणबहादूर बाबासाहेब परिचारक हे पंढरपूर नगरपालिकेचे अकरा वर्षे नगराध्यक्ष होते. या दोघांच्या पश्‍चात पंतांनी राजकारणात आणि समाजकारणात आपला ठसा उमटवला. 1958 च्या सर्वोदय संमेलनापासून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या कामातून तालुक्‍यात आपला प्रभावी गट उभा केला. सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्या वाड्याच्या ओसरीवर पंत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हजर असत. त्यामुळे सकाळपासूनच वाड्यात जाऊन लोकांना त्यांच्याशी अगदी सहजपणे संपर्क साधता येत असे. 

राजकीय कारकिर्द 
कारकिर्दीच्या सुरुवातीस पंढरपूर तालुका पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. 1972 ला सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 1978 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले. 1981 ला (कै.) पांडुरंग डिंगरे यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 1978 च्या निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता पंतांनी आपले काम नेटाने सुरू ठेवले होते. त्यामुळे पुढे 1985 पासून ते 2009 पर्यंत सलग पंचवीस वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पंढरपूर तालुक्‍याच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी विधानसभा उमेदवारीचा त्याग केला. 2019 मध्ये पंढरपूरकरांच्या आग्रहास्तव त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

जातीपातीच्या राजकारणावर मात 
जात, पात, धर्म, पक्ष अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते आलेल्या व्यक्तीला मदत करत. कार्यकर्त्याच्या सुखदुःखाशी समरस होत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या गटाची ताकद अनेक वर्षे वाढत राहिली. एखाद्या व्यक्तीने निवडणुकीत विरोधी बाजूने प्रचार केलेला असो अथवा काही कारणाने मतभेद झालेले असोत येणाऱ्या प्रत्येकाला जी शक्‍य असेल ती मदत ते करत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अडीअडचणी पंतांना नेमकेपणाने माहिती होत्या. त्यामुळेच अडचणी सांगण्यासाठी आलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याची अडचण सोडवण्यासाठी पंत तात्काळ आवश्‍यक कार्यवाही करत. 
आपण जे काम करतो ते कर्तव्य भावनेतून करतो. उपकार म्हणून नव्हे ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळे केलेल्या मदतीची वाचता सहसा कुठे करत नसत. कोणी काहीही म्हणू दे आपले काम गाजावाजा न करता करत राहायचे असे त्यांचे साधे सोपे सूत्र होते. त्यांची कामाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. विरोधी बाजूच्या लोकांना देखील ते सन्मानाने वागवत. त्यांनी कधीही विरोधी बाजूच्या लोकांवर वैयक्तिक टिका टिपणी केली नाही. निवडणूक काळात देखील आपले काम लोकांना सांगायचे आणि मत देण्याचे आवाहन करायचे इतका साधा त्यांचा अजेंडा असायचा. 

कार्यकुशल नेतृत्वाचा ठसा 
श्रीपूर येथील बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचे त्यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारीकरण केले. पंतांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याने विस्तारीकरण करुन वीज निर्मितीचा सहकार क्षेत्रातील भारतातील पहिला कार्बन क्रेडीट मिळवणारा मोठा प्रकल्प म्हणून पांडुरंग कारखान्याने नावलौकिक मिळवला. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील सर्वोच्च एफआरपी दर देणारा कारखाना म्हणून हा कारखाना नावारूपाला आला आहे. 
शेतकऱ्यांच्या विषयीची आपलेपणाची भावना त्यांच्या मनात कायम होती. जिल्ह्यात उसाला कायम सर्वाधिक दर देण्यासाठी ते कारखान्याच्या कामाचे काळजीने नियोजन करत. ऊस बिल शेतकऱ्यांना वेळेवर मिळालेच पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांचा बॅंकिंग आणि साखर कारखानदारीतील अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी आवर्जून येत असत. एखाद्या कारखान्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पंतांच्याकडे संबंधित कारखान्याचे अध्यक्ष संपर्क साधून मदत मागत आणि पंत देखील विनाअट संबंधितांना आवश्‍यक ती मदत पुरवत. बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी सभासदांना दिला जाणारा ऊस बिलाचा हप्ता चुकणार नाही याची काळजी त्यांनी शेवटच्या काळात पुण्यात दवाखान्यात उपचार सुरू असताना देखील घेतली. पुण्यातील दवाखान्यातून त्यांनी पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, पंढरपूर अर्बन बॅंकेचे सरव्यवस्थापक उमेश विरदे यांना फोन करून संपर्क साधून बिल वाटपाच्या कार्यवाहीचे आदेश दिले होते. या उदाहरणातून त्यांची शेतकऱ्यांचे विषयीची तळमळ अधोरेखित होते. 
पांडुरंग, युटोपियन कारखाने, पंढरपूर अर्बन बॅंक, बाजार समिती अशा अनेक संस्थांमधील हजारो सभासद शेतकरी आणि सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा पोशिंदा असलेल्या पंतांनी कधीही बडेजाव केला नाही. कार्यकर्त्यांच्या विषयी त्यांना कमालीची आत्मियता होती. त्यामुळे कधी कोणता कार्यकर्ता दवाखान्यात असला किंवा कौटुंबिक कारणामुळे आर्थिक अडचणीत सापडला तर ते कोणालाही न सांगता संबंधित कार्यकर्त्याला मदत करत. पंढरपूर बॅंकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदत करण्याची भूमिका घेतली. 
भाषणबाजी करण्याऐवजी शांतपणे काम करण्यावर त्यांचा अधिक भर होता. पंढरपूरच्या विकासासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली. तेव्हा श्री. पवार यांनी परिचारकांच्या आग्रहाखातर तीर्थक्षेत्रासाठी विकास योजना राबवली आणि पुरेसा निधी देखील उपलब्ध करून दिला. 

मालक नव्हे विश्वस्त 
बॅंका असोत अथवा साखर कारखाने आपण मालक नसून विश्वस्त आहोत, या विचाराने त्यांनी शेवटपर्यंत काम पाहिले. नेतृत्व करत असलेल्या संस्थांमधील प्रशासकीय खर्च विनाकारण वाढणार नाही याची काळजी त्यांनी अखेरपर्यंत घेतली. त्यांच्या विश्वस्त भूमिकेमुळेच त्यांनी जनसामान्यांचा विश्वास मिळवला होता. या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी त्यांनी शेवटपर्यंत घेतली. 

सहकारातील डॉक्‍टर 
मोहोळ तालुक्‍यातील आर्थिक अडचणीत आलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर 1986 साली त्यांची शासनाने प्रशासकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. 1989 पासून 2010 या कालावधीत त्यांनी या कारखान्यास ऊर्जितावस्थेला आणून प्रगतीपथावर पोचवले. पांडुरंग, भीमा, दामाजी, युटोपियन या कारखान्याप्रमाणेच त्यांनी इतर अनेक कारखान्यांना मार्गदर्शन केले. साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांना त्यांनी अडचणीतून बाहेर काढल्यामुळे सहकारातील डॉक्‍टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. 

लालडब्याचे रूपांतर लालपरीत 
19 जून 2000 ला एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. तेव्हा एसटीची चाके तोट्यामुळे चिखलात घट्ट रुतून बसली होती. 1993 पासून सतत तोट्यात असणारे (सुमारे सातशे कोटी रुपये) एसटी महामंडळ 2006-07 या वर्षात प्रथमच 23 कोटी नफा मिळवून आर्थिक अडचणीतून बाहेर आणले. त्यानंतर 2005 मध्ये विधानसभा अस्तित्वात येताच त्यांची पुन्हा एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाली. 2007-08 या आर्थिक वर्षात त्यांनी सुमारे 150 कोटी रुपये नफा करून दिला आणि लाल डब्याच्या एसटीचे रूपांतर लालपरी मध्ये करण्याचा प्रयत्न केला. 

कुटुंबातील सदस्य हरपल्याची जनसामान्यांची भावना 
पंतांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत चांगली होती. खेड्यापाड्यातील शेकडो लोकांना ते नावानिशी ओळखत. शब्द आणि वेळ पाळणारे ते नेते होते. होकार दिलेला कोणताही कार्यक्रम ते चुकवत नसत. किंबहुना ठरलेल्या वेळेपूर्वीच ते कार्यक्रम स्थळी पोचत. जास्ती वेळ भाषणबाजी न करता अतिशय कमी वेळात आवश्‍यक मुद्दा मांडून ते भाषण संपवत. त्यामुळे त्यांचे साधेपणाचे आणि आपुलकीचे बोलणे लोकांना भावत असे. गेल्या काही महिन्यात काठी टेकत पंत दररोज सकाळी श्री विठ्ठल मंदिर परिसरात चक्कर मारत असत. त्यावेळी व्यापारी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांशी ते सहजतेने संवाद साधत. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या निधनाने आपल्याच कुटुंबातील एक सदस्य हरपला अशी भावना जनसामान्यांमध्ये आहे. 

संपादन : वैभव गाढवे