esakal | विधानसभा पोटनिवडणुकीसाठी "स्वाभिमानी'चीही सुरू झाली चाचपणी ! "सभासद वाढवा' अभियानाचा वाढला जोर
sakal

बोलून बातमी शोधा

Swabhimani.

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, तसेच या आखाड्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अद्यापही स्पष्ट नसली तरी त्यांनी याच पार्श्वभूमीवर "सभासद वाढवा' अभियान सुरू करून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी "स्वाभिमानी'चीही सुरू झाली चाचपणी ! "सभासद वाढवा' अभियानाचा वाढला जोर

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, तसेच या आखाड्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका अद्यापही स्पष्ट नसली तरी त्यांनी याच पार्श्वभूमीवर "सभासद वाढवा' अभियान सुरू करून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसदर, एफआरपी, पीक विमा, वीजबिल, दूध दर, शेतकऱ्यांना हमीभाव या विषयांवरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा सहभाग आहे. सांगली व कोल्हापूर भागात असलेल्या या संघटनेच्या आंदोलनाचा वणवा अलीकडच्या काळात पंढरपूर परिसरातील ऊस पट्ट्याबरोबर मंगळवेढ्याच्या शिवारातही पोचला. 

पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष ऍड. राहुल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, दत्तात्रय गणपाटील, शहराध्यक्ष हर्षद डोरले, श्रीकांत पाटील, आबा खांडेकर, अनिल बिराजदार, संतोष बिराजदार, शंकर संघशेट्टी व रोहित भोसले या तरुण नेत्यांनी संघटना टिकवून वाढवण्यासाठी योगदान दिले. त्यामुळे ज्वारीच्या शिवारातही शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाची देयके, पुरेशा दाबाने वीजपुरवठा, खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी विमा कंपनीविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसून त्यांना ती रक्कम मिळवून देण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे योगदान दिले आहे. याशिवाय हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी देखील आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल मंगळवेढा परिसरामधील शेतकऱ्यांना आस्था वाटू लागली आहे. 

दरम्यान दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा होत असताना व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे निवडणुकीसाठी चाचपणी करीत असतानाच आता पांडुरंग परिवाराच्या वतीने युवा नेते प्रणव परिचारक यांनी देखील निवडणुकीबाबत अनुकूलता दाखवली आहे. 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या जागेवर निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट केली नसली, तरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अलिप्त राहण्याच्या सूचना असल्या तरी संघटनेचे पदाधिकारी मात्र सभासद वाढवा अभियान राबवून आपल्या मतदारसंघात ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या संघटनेची भूमिका पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image