esakal | पंढरपूरच्या जागेवर "स्वाभिमानी'चा दावा ! महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर पेच
sakal

बोलून बातमी शोधा

Swabhimani

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूरच्या जागेवर उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. 

पंढरपूरच्या जागेवर "स्वाभिमानी'चा दावा ! महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर पेच

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूरच्या जागेवर उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह विरोधी भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, यावर भाजपचा उमेदवार ठरणार आहे. 

दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाळे मोठे आहे. यापूर्वी 2019 मध्ये रिडालोसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार भारत भालके विजयी झाले होते. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्या वेळी परिचारकांचा आमदार भारत भालके यांच्याकडून निसटत्या मतांनी पराभव झाला होता. 

ऊस, दूध आणि शेतीमालाच्या हमी भावासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मतदारसंघात वेळोवेळी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना व त्यांच्या स्वाभिमानीला मानणारा मोठा शेतकरी व कामगार वर्ग आहे. मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता, पोटनिवडणुकीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यावी, अशी मागणी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानीच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. राजू शेट्टी यांनीही पंढरपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन दिले आहे. 

पोटनिवडणुकीसाठी 23 ते 30 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारीची घोषणा केली नाही. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोटनिवडणुकीसाठी जोर लावला आहे. स्वाभिमानीकडून तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णुपंत बागल, मंगळवेढा येथील ऍड. राहुल घुले यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी व कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात राजू शेट्टींना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते. दीड वर्षानंतरही राजू शेट्टींना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंढरपूरची जागा स्वाभिमानीला देऊन राजू शेट्टींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येईल का, या विषयीही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. दीड वर्षामध्ये मतदारसंघात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर उमेदवारी कोणाला द्यायची? याविषयी संभ्रम कायम आहे. अशा संभ्रमावस्थेत स्वाभिमानीने उमेदवारीची मागणी लावून धरल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आणखी पेच निर्माण झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल