esakal | प्रचार सभांतील गर्दीकडे दुर्लक्ष अन्‌ सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा ! "स्वाभिमानी'चे मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर आंदोलन

बोलून बातमी शोधा

Agitation

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारातील सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करून मास्क नसलेल्या सिंगल दुचाकीस्वारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलिस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले. 

प्रचार सभांतील गर्दीकडे दुर्लक्ष अन्‌ सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा ! "स्वाभिमानी'चे मंगळवेढा पोलिस स्टेशनसमोर आंदोलन
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारातील सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करून मास्क नसलेल्या सिंगल दुचाकीस्वारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलिस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले. 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना शहरामध्ये एक न्याय तर शहरालगत दुसरा न्याय देत प्रशासनाने नियमांची भीती दाखवत शहर लॉकडाउन केले आहे. परंतु जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्यामुळे त्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत. शहरात रुग्ण नसतानादेखील शहरवासीयांना प्रशासन कोव्हिड चाचण्यांचा आग्रह धरत आहे. प्रचारातील नेत्यांना तो नियम नाही का? असा सवाल शहरातील व्यापारी महासंघाकडून या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर विचारला जात आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलासा न दिल्यास पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबतही चर्चा या ग्रुपवर सुरू आहे. 

पोटनिवडणुकीनंतर तालुक्‍यामध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तालुक्‍यातील शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामीण भागातील जनतेची शासकीय कामानिमित्त सतत ये-जा असते. परंतु आलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर उपलब्ध नसते. मास्क असेल तर प्रवेश देण्याबाबत प्रशासनाकडूनही सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. 

तालुक्‍यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडत असतानाच भाजप आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील हे पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांनी मंगळवेढासह आसबेवाडी, सलगर खुर्द, शिवणगी, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, मानेवाडी, हुन्नूर, हुलजंती, सोड्डी, मरवडे या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. परंतु त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रचारामध्ये कोण कोण उपस्थित होते त्यांची कोव्हिड चाचणी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असली तरी आरोग्य यंत्रणेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. 

शहरातील व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद पाळला तर शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर येथील दुकाने खुलेआम सुरू आहेत. रस्त्यावर भाजीपाला विक्रीची दुकाने उभारल्यामुळे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे नियमांचे पालन फक्त शहरातील व्यापाऱ्यांनी करायचे का, असा सवाल व्यक्त केला जात आहे. 

पोलिस स्टेशन समोरील आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरसिंह कदम, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे ॲड. राहुल घुले, शहराध्यक्ष हर्षद डोरले, बाबा खांडेकर, संतोष बिरादार, उमेश निकम, रमेश चव्हाण आदी सहभागी झाले.

मास्क नसलेल्या सिंगल दुचाकीस्वारावर पोलिसांनी कारवाई करून आपण कारवाईत तत्पर असल्याचे दाखवले जात असले तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभेमध्ये होणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष करून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध थेट पोलिस स्टेशन समोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. 
- राहुल घुले, 
उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र