esakal | चर्चेला उधाण ! बागल गटाच्या नगरसेवकांकडून जगतापांचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Jagtap-Bagal

चर्चेला उधाण ! बागल गटाच्या नगरसेवकांकडून जगतापांचे कौतुक

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

नगरपरिषदेचे बागल गटाचे विरोधी पक्षनेते नगरसेवक श्रीनिवास कांबळे यांच्यासह तीन जणांनी थेट सत्ताधारी जगताप गटाचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे व नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले आहे.

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपरिषदेच्या (Karmala Municipal Council) राजकारणाला अचानक वेगळी कलाटणी मिळाली असून, नगरपरिषदेचे बागल गटाचे (Bagal Group) विरोधी पक्षनेते नगरसेवक श्रीनिवास कांबळे यांच्यासह तीन जणांनी थेट सत्ताधारी जगताप गटाचे (Jagtap Group) नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे व नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले आहे. एका बाजूला बागल गटाचे काही नगरसेवक जगताप यांच्या नगरपरिषदेच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत असताना श्रीनिवास कांबळे, राजश्री माने व प्रमिला कांबळे या तीन बागल समर्थक नगरसेवकांनी जगताप यांच्या कामाचे कौतुक केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. (The Bagal group's corporators have praised the work of the opposite Jagtap group)

हेही वाचा: खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत !

विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातलेला असताना देखील करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी वीणा पवार आणि नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. करमाळा नगरपरिषद क वर्ग नगरपरिषद असताना देखील वर्षभरात जवळपास वीस कोटी निधी खेचून आणला आहे. शहरातील रस्ते पक्के, मजबूत झाले आहेत. शहरातील संगम चौकातील सिंमेट कॉंक्रिट रस्ता, महावीर उद्यान, सात विहीर परिसर, नाना-नानी पार्क, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून झालेली 65 एकरामध्ये केलेली 25 हजार वृक्ष लागवड, शेकडो व्यापारी गाळे, भाजी मंडई, 160 अत्याधुनिक शौचालये, ओपन जिम, अपंगांसाठी निधी वाटप अशी एक ना अनेक विधायक कामे शहरात झाली आहेत.

हेही वाचा: "स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्‍यता !'

मुख्याधिकारी वीणा पवार व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना स्वतःला कोरोना झाला असताना देखील शहरवासीयांसाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम केले आहे. कोरोना टेस्टिंग, कोविड सेंटरचे नियोजन, लसीकरणाचे नियोजनही उत्कृष्टपणे हाताळले आहे. शहरातील झालेल्या विधायक कामांना विरोधी पक्षनेता म्हणून विरोध करण्यासाठी जागाच उरली नाही. याचा आपल्याला अभिमान आहे. शहराची वाटचाल स्मार्ट अन्‌ आदर्श शहराच्या दिशेने होत आहे. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे शहराचा चेहरा-मोहराच बदलला आहे. चांगल्या कामांना नावं न ठेवता त्याचं कौतुकच केले पाहिजे, असेही पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

loading image