esakal | सीना नदीत वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच सापडला! आईच्या आक्रोशाने हळहळले गाव
sakal

बोलून बातमी शोधा

सीना नदीत वाहून गेलेल्या मुलाचा 18 तासांनंतर सापडला मृतदेह!

पोथरे (ता. करमाळा) येथे मंगळवारी (ता. 14) सीना नदीकाठी खेळत असताना 10 वर्षांचा ओम अनिल शेळके हा पाण्यात वाहून गेला होता.

सीना नदीत वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच सापडला!

sakal_logo
By
नाना पठाडे

पोथरे (सोलापूर) : पोथरे (ता. करमाळा) (Karmala Taluka) येथे मंगळवारी (ता. 14) सीना नदीकाठी (Seena River) खेळत असताना 10 वर्षांचा ओम अनिल शेळके हा पाण्यात वाहून गेला होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत शोधूनही तो सापडला नाही. आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजता ओमचा मृतदेह पोटेगाव बंधाऱ्याशेजारी महानंदाच्या झाडाला अडकलेला दिसून आला. ओमचा मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका कमीच !

पोथरे येथे मंगळवारी साडेतीनच्या सुमारास सीना नदीत पडून ओम शेळके हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन समितीने शोधकार्य सुरू केले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते. त्याचा मच्छिमारही शोध घेत होते. पोटेगाव येथील बंधारा व संगोबा येथील बंधाऱ्यापर्यंत त्याचा शोध घेतला जात होता. यासाठी बंधाऱ्याला जाळी लावण्यात आली होती. मच्छिमार बांधव व इतर व्यक्ती या मुलाचा शोध घेत होते.

हेही वाचा: मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघात ! एक ठार, एक जखमी

ओम शेळके हा वेळू (ता. श्रीगोंदा) येथील असून, आई ललिता ही पोथरे येथे माहेरी आली होती. ललिताचे वडील आत्माराम झाडे यांची शेत सीना नदीलगत असल्याने ललिता ही जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती. त्या वेळी ओम आईसोबत असल्याने नदी काठावरून तो पाण्यात पडला होता. काल रात्री आठपर्यंत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा शोध लागला नाही. आज (बुधवारी) सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह पोटेगाव बंधाऱ्याच्या लगत महानंदाच्या झाडाला अडकल्याचा येथील रहिवासी बाळू झिंजाडे यांना दिसला. त्यांनी तत्काळ इतरांना आवाज दिला. त्यानंतर अनिल झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, आबा झिंजाडे, सचिन शिंदे, शांतिलाल झिंजाडे, सागर झिंजाडे, रवींद्र जाधव हे तिथे गेले व त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. तो ओम शेळकेचा मृतदेह होता. मामाच्या गावी आलेल्या ओमचा मृतदेह पाहताच आई ललिता व सर्व झिंजाडे परिवारात एकच आक्रोश सुरू झाला. या घटनेमुळे पोथरे गावावर शोककळा पसरली आहे.

या वेळी तलाठी मयूर क्षीरसागर, पोलिस पाटील संदीप पाटील, सरपंच धनंजय झिंजाडे, मंडळ अधिकारी राजेंद्र राऊत, किसन आबा झिंजाडे, अनिल दळवी, चंदू झिंजाडे, नाना झिंजाडे, पोलिस हवालदार मारुती रणदिवे आदी उपस्थित होते.

loading image
go to top