esakal | पुढील वर्षी तरी तुकोबांची सेवा करायची संधी मिळावी ! यंदा तुकोबांच्या रिंगणास मुकावे लागले
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील वर्षी तरी तुकोबांची सेवा करायची संधी मिळावी !

पुढील वर्षी तरी तुकोबांची सेवा करायची संधी मिळावी !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोहळ्यातील भाविकांसह माळीनगरकरांना ही संधी याची देही याची डोळा अनुभवण्यापासून मुकावे लागले आहे.

माळीनगर (सोलापूर) : आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) यंदा पायी पालखी सोहळा निघाला असता, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील (Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremonies) पहिले उभे रिंगण माळीनगरमध्ये पार पडले असते. कोरोनाच्या (Covid-19) महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोहळ्यातील भाविकांसह माळीनगरकरांना ही संधी याची देही याची डोळा अनुभवण्यापासून मुकावे लागले आहे. कोरोनाचे संकट लवकर टळून पुढील वर्षी हा आनंद द्विगुणित करण्याची संधी उपलब्ध व्हावी, अशी माळीनगरकरांची मनोमन इच्छा आहे. (The citizens of Malinagar hope to get a chance to serve Tukaram Maharaj next year-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले! बार्शीच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी

अकलूजचा मुक्काम आटोपून तुकोबांचा पालखी सोहळा आजच्या दिवशी सकाळच्या रम्य प्रहरी माळीनगरात दाखल होत असतो. सोहळा माळीनगर हद्दीत प्रवेश करताच उभे रिंगणासाठी श्रीहरिनगर येथे मुख्य रस्त्यावर विसावते. त्यावेळी वारकरी कधी कोवळे ऊन तर कधी रिमझिम पाऊस अंगावर झेलत अभंग आळवत असतात. टाळ-मृदंगाच्या गजरात ते तल्लीन होतात. आकाशात फडफडणाऱ्या केशरी पताका शोभून दिसतात. पालखीच्या आगमनाने माळीनगरवासीयांमध्ये उत्साह संचारलेला असतो.

रथाच्या पुढील व मागील दिंड्यांमधील वारकरी रिंगणासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगा करण्यात मग्न असतात. त्यामध्ये रांगोळीच्या पायघड्या टाकल्या जातात. चोपदार रिंगण व्यवस्थेची पाहणी करतात. प्रशासनातर्फे देखील दोर लावून रिंगणाची काळजी घेतली जाते. चोपदारांनी चोप उंचावला की प्रथम बाभूळगावकरांचा बिगर स्वाराचा व नंतर मोहिते पाटील यांचा स्वार असलेला अश्व दौड मारतो. दोन्ही अश्व तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन फेऱ्या पूर्ण करतात. रिंगण पूर्ण झाल्यावर वारकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. ते देहभान विसरून झिम्मा, फुगडी खेळण्यात दंग होतात. वारकऱ्यांसह गावकरी अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी धडपडतात. त्यानंतर रथ पालखी तळावर येतो. तेथे माळीनगर कारखान्याने उभारलेल्या शामियान्यात पालखी ठेवली जाते. कारखान्यातर्फे महापूजा होते. त्यानंतर समाजआरती होते. देहू संस्थानच्या मानकऱ्यांचा कारखान्यातर्फे सत्कार केला जातो. दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडते. बाळगोपाळ वस्तू खरेदी करण्यात मग्न असतात. माळीनगर कारखान्याच्यावतीने व्यापक प्रमाणात अन्नदान केले जाते. येथील विसावा आटोपून सोहळा दुपारी बोरगावकडे मार्गस्थ होतो. गेली दोन वर्षांपासून कोरोनाने ही संधी हिरावून घेतली आहे. याची खंत माळीनगरकरांच्या मनात आहे.

हेही वाचा: "या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

पालखी येण्यापूर्वी आठवडाभरापासून विविध कामे सुरू असतात. गावात पालखी आल्यावर नागरिकांना स्फूर्ती, प्रेरणा व ऊर्जा मिळते. मने प्रफुल्लित होतात. पालखी अनुदान मिळाल्याने वारकरी व गावासाठी सोईसुविधा उपलब्ध होतात. दोन वर्षांपासून तुकोबांच्या सोहळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, याचे अतीव दुःख वाटते. जगातील कोरोना जाऊन पुढील वर्षी तुकोबांची सेवा करायची संधी पांडुरंगाने द्यावी.

- अभिमान जगताप, सरपंच

loading image