esakal | कडक लॉकडाउननंतर वाढले 52 हजार 511 रुग्ण ! शहरात मृत्यूदर सर्वाधिक

बोलून बातमी शोधा

Corona
कडक लॉकडाउननंतर वाढले 52 हजार 511 रुग्ण ! शहरात मृत्यूदर सर्वाधिक
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता एक लाख दोन हजार 611 झाली आहे. तर त्यातील दोन हजार 797 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कडक लॉकडाउन केल्यानंतर 15 एप्रिल ते 1 मे या काळात कोरोनाच्या विषाणूची साखळी खंडित होईल, असा विश्‍वास होता. मात्र, या 16 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात 52 हजार 511 रुग्ण वाढले असून 584 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील 52 तर ग्रामीणमधील अंदाजित 70 रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 17 हजारांवर गेली असून ऑक्‍सिजनची गरज पुन्हा वाढली आहे. जिल्ह्यातील करमाळा, माढा, पंढरपूर, बार्शी, माळशिरस या तालुक्‍यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे. दरम्यान, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाल्यापासून (7 एप्रिल) आतापर्यंत दोन्ही तालुक्‍यात साडेसात हजार रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे, या दोन्ही तालुक्‍यातील 82 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचा: Pandharpur Elections : आवताडेंचा विजय पक्का ! कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

शासनाने कडक निर्बंध लागू केले असतानाही बिनधास्तपणे घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या गावोगावी लक्षणीय दिसत आहे. प्रत्येक गावामध्ये पोलिसांचा वॉच ठेवणे कठीण असल्याने नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, लक्षणे असल्यास कोरोना टेस्ट करून वेळेत निदान करून घ्यावे, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही केले जात आहे.

ठळक बाबी...

  • कडक लॉकडाउननंतर ग्रामीणमध्ये 47 हजार 694 रुग्णांची वाढ; 316 रुग्णांचा मृत्यू

  • शहरात 15 एप्रिल ते 1 मे या कालावधीत चार हजार 817 रुग्णांची वाढ; 268 रुग्णांचा मृत्यू

  • शहर- जिल्ह्यात मागील 16 दिवसांत 584 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

  • कडक लॉकडाउननंतर शहर-जिल्ह्यात 52 हजार 511 रुग्णांची वाढ

  • पंढरपूर-मंगळवेढ्यात 7 एप्रिलनंतर साडेसात हजार रुग्णांची वाढ; 82 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू