आपल्याच लेकरांनी केलेले घाव सोसणारी 'डीसीसी' ठणठणीत होणार कधी?

आपल्याच लेकरांनी केलेले घाव सोसणारी 'डीसीसी' कधी ठणठणीत होणार?
DCC Bank Solapur
DCC Bank Solapuresakal
Summary

जिल्हा बॅंकेवर प्रशासक येण्यापूर्वी संचालक मंडळातील काही तत्कालीन संचालकांनी डीसीसीवर घातलेले घाव आजही डीसीसी सोसत आहे.

सोलापूर : सातारा (Satara) आणि सांगली (Sangli) डीसीसीच्या (DCC Bank) निवडणुकीचा गुलाल पाहून जिल्ह्यातील काही नेत्यांनाही सोलापूर डीसीसीचा (Solapur DCC Bank) गुलाल खेळण्याची इच्छा झाली होती. बॅंकेचे आर्थिक कारण देत राज्य सरकारने (Maharashtra State Government) सोलापूरचा गुलाल पुढे ढकलला. जिल्हा बॅंकेवर प्रशासक येण्यापूर्वी संचालक मंडळातील काही तत्कालीन संचालकांनी डीसीसीवर घातलेले घाव आजही डीसीसी सोसत आहे. आपल्याच लेकरांनी केलेले घाव सोसणारी डीसीसी कधी ठणठणीत होणार? या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी कोणाकडे दिसत नाही.

DCC Bank Solapur
MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत

बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी यापूर्वी सांगली जिल्हा बॅंकेत प्रशासक म्हणून काम केले. अवघ्या अडीच ते पावणेतीन वर्षात सांगली बॅंक चांगली करण्यात प्रशासक कोथमिरे यांना यश मिळाले. सोलापूर जिल्हा बॅंकेतील बिगरशेतीच्या थकबाकीचा पाषाण मात्र प्रशासक कोथमिरे यांना फुटताना दिसत नाही. त्यांच्या कुशलतेने बॅंकेच्या ठेवी वाढल्या, थकित बिगरशेती कर्जाचे काय? याचे ठोस उत्तर मात्र कोणाकडेही नाही. जिल्हा बॅंकेवर प्रशासक नियुक्त करून जवळपास साडेतीन वर्षे झाली, तरीही बॅंकेच्या बिगरशेती कर्जाचा विषय जागेवरून हलताना दिसत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा मोठा आधार जिल्हा बॅंकेला मिळाला. कर्जमाफी झाली नसती तर जिल्हा बॅंकेची स्थिती यापेक्षाही वाईट दिसली असती.

जिल्हा बॅंकेत ज्या संचालकांना मोठ्या विश्‍वासाने पाठविले त्याच संचालकांनी स्वत:च्या व नातेवाइकांच्या संस्थांसाठी कोट्यवधी रुपयांची कर्जे नियमात बसवून घेतली. घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या संस्थांकडून अद्यापही झालेली नाही. बिगरशेतीचे जवळपास 982 कोटी रुपये व्याज व मुद्दल थकित आहे. शेतकऱ्यांकडील रक्कम वसुलीसाठी गेलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांना आता बिगरशेतीच्या थकित कर्जाचे वाईट अनुभव येऊ लागले आहेत. 'साहेब लगेच कर्जाची रक्कम भरतो' म्हणणारे शेतकरी साहेब जाताच बदलतात. 'अगोदर त्या माजी संचालकांकडील कर्जाची थकित रक्कम वसूल करा, मग आमच्याकडे या' अशी भावना काही शेतकऱ्यांमध्ये तयार होऊ लागली आहे.

या थकबाकीचे काय होणार?

  • आर्यन शुगर : 334 कोटी रुपये

  • शिवरत्न उद्योग/शिक्षण संस्था/ दवाखाना : 139 कोटी रुपये

  • सिद्धनाथ शुगर : 123 कोटी रुपये

  • स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना : 119 कोटी रुपये

  • सांगोला सहकारी साखर कारखाना : 99 कोटी रुपये

  • शंकर सहकारी साखर कारखाना : 86 कोटी रुपये

  • आदित्यराज शुगर : 69 कोटी रुपये

  • संत दामाजी सहकारी साखर कारखाना : 13 कोटी रुपये

आकडे बोलतात...

  • वर्ष : ठेवी : कर्ज व ऍडव्हान्स : निव्वळ एनपीए : तोटा

  • 2018-19 : 2 हजार 712 कोटी 2 हजार : 210 कोटी : 43.29 टक्के : 89 कोटी

  • 2019-20 : 2 हजार 991 कोटी 2 हजार : 317 कोटी : 39.10 टक्के : 242 कोटी

  • 2020-21 : 3 हजार 311 कोटी 2 हजार : 675 कोटी : 35.51 टक्के : 162 कोटी

DCC Bank Solapur
सांगली, सातारा डीसीसी गुलालात माखली, मग सोलापूर का घाबरली?

बॅंकेची शेती व बिगरशेती कर्जाची थकित रक्कम वसूल करण्यासाठी गतिमान प्रशासन आवश्‍यक आहे. थकित कर्ज वसुलीशिवाय बॅंकेला पूर्वीचे दिवस येणे कठीण आहे. कायद्याच्या चौकटीतून व नियमित पाठपुराव्यानंतर थकित कर्जाची वसुली होत असल्याचा आमचा अनुभव आहे. बॅंकेत पूर्वी रुजवात पद्धत होती. मधल्या काळात ती पद्धत बंद पडली होती. मी चेअरमन असताना ती पद्धत सुरू केली होती. आता पुन्हा ती बंद पडली आहे.

- राजन पाटील, माजी चेअरमन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com