esakal | Solapur : आपत्कालीन परिस्थितीत शाळा बंद ठेवण्याचा मुख्याध्यापकांना अधिकार
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

शाळा सुरू होण्यापूर्वी दहा हजार शिक्षकांचे लसीकरण करून घेण्यात आले असून, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी "हेल्थ क्‍लिनिक' उभारले जाणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत शाळा बंद ठेवण्याचा मुख्याध्यापकांना अधिकार

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील जवळपास दीडशे तर ग्रामीणमधील एक हजार 830 शाळांची (School) घंटा सोमवारी (ता. 4) वाजणार आहे. ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावी तर शहरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी दहा हजार शिक्षकांचे लसीकरण करून घेण्यात आले असून, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी 'हेल्थ क्‍लिनिक' (Health Clinic) उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी दिली.

जिल्ह्यातील दोन हजार 800 पैकी तब्बल दोन हजार शाळा "स्वच्छ शाळा, सुंदर शाळा' उपक्रमाअंतर्गत चकाचक झाल्या आहेत. परिसर स्वच्छता, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, बगीचा, बोलक्‍या भिंतींच्या माध्यमातून शाळांचे रुपडे पालटले आहे. त्याच शाळांमध्ये आता दीड वर्षाने विद्यार्थी जाणार आहेत. सुरवातीला किमान 15 दिवस विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास देऊ नये, जेवणावेळी गर्दी होऊ नये, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ असावा, अशा सूचनाही स्वामी यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांना दिल्या आहेत.

दुसरीकडे, जिल्ह्यातील जवळपास 900 गावे कोरोनामुक्‍त झाल्याने शाळा सुरू करण्यास कोणतीही अडचण असणार नाही, असा विश्‍वासही स्वामी यांनी व्यक्‍त केला. विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी, त्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर देणे, ताप अथवा आजारी असलेल्या मुलावर प्रथोमपचार करून नातेवाइकांना त्याची माहिती देण्यासाठी सर्वच शाळांमध्ये "हेल्थ क्‍लिनिक' उभारले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: ऑक्‍टोबर हीटचा वाढणार जोर! 'अशी' घ्या काळजी

साडेदहा ते पाचपर्यंत चालणार शाळा

पाचवी ते सातवीचे वर्ग तब्बल दीड वर्षाने सुरू होत आहेत. ऑनलाइन शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांसह ऍन्ड्राइड मोबाईल नसल्याने शिक्षणाची गोडी कमी झालेल्या विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, सायंकाळी पाच वाजता शाळेची सुटी होईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सांगितले.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार! 'ही' आहेत कारणे

मुख्याध्यापकांना शाळा बंदचा अधिकार

सध्या पावसाळा सुरू असून काही तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. नद्या, नाले, ओढे तुडूंब वाहू लागल्याने वाड्या - वस्त्यांवरील नागरिकांची ये-जा बंद झाली आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. परंतु, जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणची परिस्थिती पाहून शाळा बंद ठेवायची की सुरू ठेवायची, याचा निर्णय संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनीच घ्यावा, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

loading image
go to top