esakal | चिमुकलीच्या 'त्या' उत्तराने समोर आले ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव !
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकलीच्या 'त्या' उत्तराने समोर आले ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव !

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.

चिमुकलीच्या 'त्या' उत्तराने समोर आले ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : परिसर अभ्यास भाग-एक अंतर्गत सोलापुरातील (Solapur) एका नामांकित शाळेतील शिक्षकांनी तिसरीतील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. त्यामध्ये "काय करावे बरं' या मुद्द्याखाली एक प्रश्‍न विचारला. "सुरीने भाजी कापताना आईचे बोट कापले?' त्यावर तिसरीतील चिमुकलीने असे सांगितले की, "सुरीला दवाखान्यात नेऊन उपचार करायला हवेत.' कृतीयुक्‍त शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना आभासी ऑनलाइन शिक्षण (Online Education) दिले जात असल्याने त्यांना सजीव व निर्जीवमधील फरकदेखील समजत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा: शाळा बंदमुळे दुष्टच्रकात भावी पिढी! दोन लाख विद्यार्थी प्रवाहाबाहेर

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या एक लाखाहून अधिक शाळा असून त्याअंतर्गत सव्वादोन कोटी विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. परंतु, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. सध्या राज्यातील 46 हजार 365 शाळांमधील एक कोटी तीन लाख सात हजार 457 विद्यार्थ्यांपैकी साडेसतरा हजार शाळांमध्ये 15 लाखांपर्यंतच विद्यार्थी शाळेत येत आहेत. ऑफलाइन शिक्षणाला बगल देऊन ऑनलाइन शिक्षणावर जोर द्यावा, असे शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणातून अभ्यासक्रम उकरण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे की काय, अशी स्थिती आहे. कृतीयुक्‍त शिक्षणदेखील ऑनलाइन दिले जात असल्याने पहिली ते चौथीतील मुलांना अजूनही सजीव, निर्जीवमधील फरक समजलेला नाही. त्यांच्यात संवेदनशीलता, भावना, भास-आभास याच्याबद्दल अज्ञान दिसून येत आहे. अनेक मुलांमध्ये डोळ्याचे, कानाचे आजार बळावले असून वजनातही वाढ झाली आहे. पाठ्यपुस्तक बाजूला ठेवून मुलांच्या हाती मोबाईल आल्याने दिवसभर ते मोबाईल घेऊन बसतात, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, शाळांच्या अंतर्गत चाचण्यांमध्ये 60 टक्‍क्‍यांहून अधिक मुलांची पाटी कोरीच असल्याचे अनुभव शिक्षक सांगतात. हे वास्तव बदलून प्रवाहाबाहेरील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी ऑफलाइन शाळा सुरू व्हायला हव्यात, असे पालकांना वाटत आहे.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

ऑफलाइन शाळांच्या निर्णयाची टोलवाटोलवी

सोलापूर जिल्ह्यातील आठशेहून अधिक गावांमधील कोरोना हद्दपार झाला आहे. माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ या तालुक्‍यातील काही गावांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या वास्तवतेचे दर्शन होऊनही शासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. राज्याचे शिक्षण संचालक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना ऑफलाइन शाळा सुरू करण्याबाबत विचारले. परंतु त्यांनी टास्क फोर्स, मंत्रिमंडळाकडे बोट दाखविले आहे. तरीही, मागील एक-दीड महिन्यापासून ज्या गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, त्या ठिकाणी ऑफलाइन शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पालक, विद्यार्थी, शिक्षक करू लागले आहेत.

वास्तव ऑनलाइन शिक्षणाचे...

  • जिल्ह्यातील चार हजार शाळांमधील सव्वापाच लाख विद्यार्थ्यांपैकी सव्वादोन लाख विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल नाहीत

  • कोरोनामुक्‍त गावांमधील पारावरील शाळा झाल्या बंद; विद्यार्थी बालमजुरीकडे वळले अन्‌ बालविवाहातही वाढ

  • तिसरीपासून पुढे शाळा सुरू करण्याची मागणी; तिसऱ्या लाटेच्या भीतीने टास्क फोर्स व मंत्रिमंडळातून होईना निर्णय

  • ऑनलाइन शिक्षणापासून दूर विद्यार्थ्यांमधील कमी झाली शिक्षणाची गोडी; लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

  • ऑफलाइन शाळा बंदमुळे अल्पवयीन मुलीच्या विवाहाची पालकांना घाई; मुलींच्या स्वप्नाचा पालकांकडून चुराडा

loading image
go to top