esakal | भारतीय, युरोपियन कलेचे संगम असलेले 'इंद्रभवन' होणार ऐतिहासिकदृष्ट्या स्मार्ट | Solapur News
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय, युरोपियन कलेचे संगम असलेले "इंद्रभवन' होणार ऐतिहासिकदृष्ट्या स्मार्ट

सोलापूर महापालिकेची इंद्रभवन इमारत ही हेरिटेज वास्तूचा एक सुंदर नमुना आहे.

भारतीय, युरोपियन कलेचे संगम असलेले 'इंद्रभवन' होणार स्मार्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महापालिकेची (Solapur Municipal Corporation) इंद्रभवन (Indrabhavan) इमारत ही हेरिटेज वास्तूचा (Heritage architecture) एक सुंदर नमुना आहे. भारतीय (Indian) व युरोपियन (European) कलाकुसरीचा प्रभाव असलेली ही इमारत मूळ रूपात आणण्याकरिता स्मार्ट सिटीतून (Smart City) या इमारतीचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी साधारण सात कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

शहरातील एकूण 119 हेरिटेज वास्तूंमध्ये सोलापूर महापालिका इंद्रभवन इमारतीचाही समावेश आहे. गेल्या 108 वर्षांपासून ही इमारत वेगवेगळ्या कारणांसाठी वापरण्यात आली. तर 1944 पासून या इमारतीतून महापालिकेच्या कारभाराला सुरवात झाली. पूर्वी पदाधिकाऱ्यांसह प्रशासन अधिकाऱ्यांचा संपूर्ण कारभार याच इमारतीत चालत होता. गेल्या 50 वर्षांमध्ये अधिकाऱ्यांनी आपल्याला हवा तसा ऑफिसचा अंतर्गत ढाचा बदलला. हे बदल करताना ऐतिहासिक वास्तूच्या दृष्टीने कोणतेही मार्गदर्शन घेतले गेले नाही. त्यातच इमारत जुनी असल्याने दर दोन वर्षांनी रंगरंगोटी करून सुंदर बनविताना त्या इमारतीचा मूळ ढाचा बदलून टाकण्यात आला आहे.

ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जतन करण्यासाठी वेळोवेळी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होणे गरजेचे होते. ऐतिहासिक वास्तूच्या अनुषंगाने या इमारतीची देखभाल झालेली नाही. तब्बल 108 वर्षांनंतर स्मार्ट सिटीतून या इमारतीचे संवर्धन करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी साधारणत: सात कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: Solapur : विकासाच्या वाटा मृगजळच ठरणार का?

स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये 'हे' आढळले

स्मार्ट सिटीतून या ऐतिहासिक इमारत दुरुस्तीचे काम दिल्लीचे आर्किटेक्‍चर मुनीश पंडित यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यांनी इमारतीच्या केलेल्या स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये स्पष्ट केले की, इमारतीमध्ये चुकीच्या पध्दतीने शौचालय बांधण्यात आले आहे. ड्रेनेज व प्लम्बिंग सिस्टिम पूर्णत: चुकीची झाली आहे. कॅरीडोअर, बाल्कनी आदी पूर्णतः बंद करण्यात आले आहे. तिसऱ्या मजल्यावरील इमारत ही पूर्ण निकामी झाली आहे. इमारतीमधील लाकूड कुजल्याने ते कधीही ढासळण्याची शक्‍यता आहे.

अशी ही सुंदर कलाकुसरीची इमारत

सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणारी सोलापूर इंद्रभवन इमारत ही कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या इमारतीचे साधारण 25 हजार स्क्वेअर फूट जागेवर 18 हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये चालुक्‍य काळातील भारतीय कलाकुसर तसेच विजयपूर येथील ऐतिहासिक वास्तूंचा प्रभाव आणि बरोक, रोकोको या युरोपियन शैलींचाही समावेश दिसून येतो.

इमारतीला 108 वर्षे पूर्ण

पुण्यश्‍लोक अप्पासाहेब वारद यांनी 1898 मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरवात केली. 1913 साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. 108 वर्षांनंतर या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याचे काम करण्यात येत आहे. इमारतीच्या छताचे स्ट्रक्‍चर उभारण्यासाठी लाकूड आणि लोखंड यांचा उपयोग केला आहे. भिंतींसाठी दगड व चुन्याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा: आपत्कालीन परिस्थितीत शाळा बंद ठेवण्याचा मुख्याध्यापकांना अधिकार

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिका इंद्रभवन इमारत ऐतिहासिक दृष्टीने संवर्धन करण्याचे काम करण्यात येत आहे. पंजाब, दिल्ली येथील राजवाड्यांचे काम केलेल्या मुनीश पंडित यांना ते दिले असून, पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. सहा महिन्यात हे संवर्धनाचे काम पूर्ण होईल.

- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, सीईओ, स्मार्ट सिटी

महापालिका इंद्रभवनचे पहिल्यांदाच ऐतिहासिक वास्तू म्हणून सुशोभीकरण करण्यात येत आहे. यासाठी साधारणत: 7 ते 8 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. यातून पुढील 50 वर्षे या इमारतीचे सौंदर्य अबाधित राहणार आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top