Engineers Day : अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे सोलापुरात जलक्रांती!

अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे जलक्रांती! सोलापूर झेडपीने महाराष्ट्राला दिली नवी दिशा
Engineers Day
Engineers DayCanva
Summary

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणाऱ्या अभियंता दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या कल्पकतेवर टाकलेला हा प्रकाशझोत.

सोलापूर : छत्रपती राजश्री शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राला (Maharashtra) कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे मिळाले. या बंधाऱ्यांत पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांची दारे टाकणे व उघडणे ही कामे वेळेवर होणे आवश्‍यक आहे. काळाच्या ओघात हे बंधारे दुर्लक्षित झाले होते. बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचला होता. सोलापूर जिल्हा परिषदेतील (Solapur Zilla Parishad) अभियंत्यांनी (Engineer) कल्पकता वापरत दुर्लक्षित बंधारे पुन्हा एकदा वापरात आणले आहेत. अभियंत्यांच्या या कल्पकतेतूनच सोलापूर जिल्ह्यात जलक्रांती साकारली आहे. या जलक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. दुष्काळी भाग सिंचनाखाली येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Bharat Ratna Sir Mokshagundam Vishweshvaraya) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणाऱ्या अभियंता दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या कल्पकतेवर टाकलेला हा प्रकाशझोत.

Engineers Day
बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका कमीच !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सध्या कात टाकत आहे. सर्वसामान्यांशी निगडित असलेले शिक्षण व आरोग्य विभागामध्ये कमालीचा सकारात्मक बदल दिसू लागला आहे. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदेतील जलसंधारण विभागही कात टाकू लागला आहे. सीईओ स्वामी यांच्या संकल्पनेतील जलसंधारण विभाग साकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांचे पाठबळ अभियंत्यांना मिळत आहे. अभियंत्यांच्या कल्पकतेला वरिष्ठांच्या पाठबळाची जोड मिळाल्याने जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात सिंचन सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. जिह्यातील जलस्रोतांचे बळकटीकरण होऊ लागले आहे. जलसंधारण विभागात नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी पद्धतीचे 732 बंधारे आहेत. बंधाऱ्यांची दारे वेळेवर टाकली व काढली जात नव्हती, अनेक ठिकाणची दारेही गायब झाली होती. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले बंधारे वापराविना उभे होते. अभियंत्यांच्या कल्पकतेने या बंधाऱ्यांवर निम्म्या उंचीपर्यंत म्हणजे साधारणत: दीड ते दोन मीटरपर्यंत सिमेंटची पडदी टाकण्याचे नावीन्यपूर्ण काम जिल्हा परिषदेतील अभियंत्यांनी केले आहे. हे काम करत असतानाच बंधाऱ्यात वर्षानुवर्षे साचलेला गाळही काढण्यात आला. त्यामुळे दुर्लक्षित झालेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता 150 पटीने वाढली आहे. जिल्ह्यातील 732 बंधाऱ्यांपैकी मार्च 2021 अखेर 602 बंधाऱ्यांवर सिमेंट पडदी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी 402 कामेही पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे उर्वरित कामांना ब्रेक लागला. लवकरच उर्वरित कामेही पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग प्रयत्नशील आहे.

Engineers Day
सात तालुक्‍यांमधील चिमुकली पुस्तकाविनाच ! साडेतेरा लाख पुस्तके पडून

कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी अभियंत्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावले. त्यांनी केलेला हा प्रयत्न सुरवातीला महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने ही कामे नाकारली होती. अशा पद्धतीने कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेने या कामांसाठी सेस फंडाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून ही कामे पूर्ण करून घेतली. या कामामुळे वाढलेली साठवण क्षमता, परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात झालेला बदल लक्षात येताच महाराष्ट्राचे तत्कालीन मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोलापूरला येत आवर्जून या कामांची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील अभियंत्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करत संपूर्ण राज्यात सोलापूर प्रमाणे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्यातील अभियंत्यांनी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे दुरुस्तीसाठी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली. हे या सोलापूर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांचे मोठे यशच मानावे लागेल. अभियंत्यांनी दाखविलेल्या या कल्पकतेमुळे आता कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पूर्वीपेक्षा आता दीडशे पट पाणी जास्त साठवू लागले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ज्या भागात कॅनॉल, नदी नाही अशा दुष्काळी भागात शाश्वत सिंचन व्यवस्था आता तयार झाली आहे.

आकडे बोलतात...

  • निम्म्यापर्यंत भिंत बांधलेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे

  • अक्कलकोट : 38

  • बार्शी : 61

  • करमाळा : 26

  • माढा : 20

  • माळशिरस : 57

  • मंगळवेढा : 20

  • मोहोळ : 39

  • उत्तर सोलापूर : 25

  • पंढरपूर : 43

  • सांगोला : 45

  • दक्षिण सोलापूर : 28

  • एकूण : 402

(मार्च 2021 पर्यंत 602 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांवर सिमेंटची भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी 402 कामे मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.)

दृष्टिक्षेपात झेडपीचे जलसंधारण

  • कोल्हापुरी बंधारे

  • एकूण संख्या : 732

  • पाणी साठवण क्षमता : 70075 सघमि

  • सिंचन क्षेत्र : 23888

पाझर तलाव

  • एकूण संख्या : 1264

  • पाणी साठवण क्षमता : 137742 सघमि

  • सिंचन क्षेत्र : 26035

गाव तलाव

  • एकूण संख्या : 232

  • पाणी साठवण क्षमता : 9594 सघमि

  • सिंचन क्षेत्र : 1992

सिमेंट बंधारे

  • एकूण संख्या : 1081

  • पाणी साठवण क्षमता : 15505

  • सिंचन क्षेत्र : 7145

आता येणार फेझर निडल्स

कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी पूर्वी लोखंडी दरवाजे असायचे. या एका दरवाजांचे वजन 80 किलोच्या आसपास होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाजे टाकण्याचे आणि काढण्याचे काम सहजपणे करता येत नव्हते. शासनाने यामध्ये बदल करत फायबरचे (फेझर कम्पोझिट निडल) दरवाजे बसविले जाणार आहेत. नवीन पद्धतीच्या या एका दरवाजाचे वजन साधारणत: 40 ते 50 किलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेला महिना अखेरपर्यंत नवीन पद्धतीचे दरवाजे मिळतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांनी दिली. आपल्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांवर निम्म्यापर्यंत सिमेंट भिंत बांधण्यात आल्याने नवीन पद्धतीचे दरवाजे बसविणे आणखी सोपे होणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com