सोलापूरकरांचा प्रवास होणार वेगवान

सोलापूर- वाडी दरम्यान रेल्वे धावणार आता विजेवर
सोलापूरकरांचा प्रवास होणार वेगवान

सोलापूर : सोलापूर विभागातील सोलापूर-वाडी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर ते वाडी दरम्यान रेल्वे विजेवर धावणार आहेत. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास अधिक गतीमान होणार आहे.

२०१० पासून सोलापूर विभागात दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. सोलापूर ते वाडी या १७० किमी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर लवकरच विजेवरील गाड्या धावणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना याचा फायदा होणार आहे. दुधनी ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते वाडी या दरम्यान यापूर्वीच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या सेक्‍शनमध्ये गाड्या विजेवर धावण्यास सुरवात झाली आहे. सोलापूर ते होटगी हा १५ किमीच्या सेक्‍शनदरम्यान विद्युतीकरणाचे काम राहिले होते. हे कामदेखील आता पूर्ण झाले आहे.

या मार्गाची पाहणी मुख्य संरक्षक आयुक्‍त मनोज अरोरा यांनी नुकतीच केली. याच मार्गावर ताशी ११० किमी वेगाने विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. सध्या मोहोळ ते बाळे आणि भाळवणी ते भिगवण दरम्यान विद्युतीकरणाचे आणि दुहेरीकरणाचे काम सुरु असून हेदेखील काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सध्या सोलापूर रेल्वेस्थानक ते मोहोळ दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा वाद असल्याने हे काम थांबले आहे.

विजेवरील रेल्वेमुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे. सोलापूर ते वाडी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर लवकरच विजेवरील मेल, पॅसेंजर, एक्‍सप्रेस व मालगाड्या धावणार आहे. यावेळी प्रधान मुख्य विद्युत अभियंता गोपाल चंद्रा, मुख्य विद्युत वितरण अभियंता एच. एम. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनिअर अनुभव वार्ष्णेय, अभियांत्रिकी, परिचालन, सिग्नल ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभाग व इतर विभागचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्युतीकरणाच्या कामावर दृष्टीक्षेप

दुधनी ते कलबुर्गी १४० किमी, कलबुर्गी ते वाडी १५७ किमी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सेक्‍शनमध्ये गाड्या विजेवर धावण्यास सुरवात झाली आहे. आता, सोलापूर ते होटगी या सेक्‍शनचेदेखील काम पूर्ण होऊन चाचणी देखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर ते वाडी दरम्यान विजेवर गाड्या धावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com