आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याआधी व्हावी बेवारस "हालचिंचोळी'ची दुरुस्ती !

आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याआधी हालचिंचोळी तलावाची दुरुस्ती करण्याची गरज
Halchincholi
HalchincholiCanva
Summary

समांतर रेषेत पडलेल्या भेगा, वाढलेली चिलार, काटेरी झुडपे, खचलेले दगडी पिचिंग व सांडव्याच्या बांधकामाची पडझड झाल्याने हा तलाव कधीही मान टाकू शकतो.

सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot) शहरास एकेकाळी पाणीपुरवठा करणाऱ्या हालचिंचोळी तलावाची (Halachincholi Lake) सध्या भयानक व भयावह स्थिती झाली आहे. समांतर रेषेत पडलेल्या भेगा, वाढलेली चिलार, काटेरी झुडपे, खचलेले दगडी पिचिंग व सांडव्याच्या बांधकामाची पडझड झाल्याने हा तलाव कधीही मान टाकू शकतो. त्यामुळे वेळीच दक्षता घेऊन त्याची तातडीने दुरुस्ती केल्यास संभाव्य नुकसान टळेल; अन्यथा आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धोका झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यापेक्षा आधीच दुरुस्ती करणे निकडीचे राहील. कोणाचीही मालकी न सांगणाऱ्या या "बेवारस' तलावाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (The need to repair the Halachincholi pond before an emergency arises)

Halchincholi
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

दुष्काळात म्हणजे 1972 मध्ये निर्माण झालेला हालचिंचोळी तलाव चाळिशी पार करीत आहे. आजच्या घडीलाही या तलावात जवळपास चार मीटर पाणीसाठा आहे. या तलावावर प्रारंभी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची मालकी होती. अक्कलकोट शहरास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. 22 डिसेंबर 1995 रोजी हा तलाव कार्यकारी अभियंता, परिसर अभियांत्रिकी विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी हा तलाव परिसर अभियांत्रिकी विभागाकडून अक्कलकोट नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला. नंतरच्या काळात हिळ्ळी बंधाऱ्यावरून व कुरनूर धरणातून पाणीपुरवठा होऊ लागल्याने हालचिंचोळी तलावाकडे अक्कलकोट नगरपालिकेचे म्हणावे तसे लक्ष राहिले नाही. त्यामुळे या तलावाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. अक्कलकोट नगरपालिकेच्या दृष्टीने या तलावाची उपयोगिता संपली अन्‌ पालिका आर्थिक सक्षम नसल्याने या तलावाची दुरुस्ती करण्याची ताकदही नाही. त्यामुळे हा तलाव दुरुस्त करण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न होण्याची गरज आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हालचिंचोळी तलावास भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सविस्तर चर्चाही केली आहे. भविष्यातील पावसाळ्याचा विचार करता या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Halchincholi
का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू

1995 पासून या तलावातून अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा होऊ लागल्याने हे पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आल्याने या तलावातून शेतीसाठी पाणी देणे बंद करण्यात आले. जवळपास दहा किलोमीटर लांबीच्या कालव्यातून शेतीसाठी या तलावातून पाणी देण्यात येत होते. 506 हेक्‍टरवरील क्षेत्रास याचा लाभ होत होता. आता या तलावाची दुरुस्ती करून हा तलाव पुन्हा सिंचनासाठी वापरण्यात आला तर कृषी उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होईल.

हालचिंचोळी तलावाची वैशिष्ट्ये

  • लांबी : 648 मीटर :

  • उंची : 13.30 मीटर

  • पाणीसाठी : 2.81 द.ल.घ.मी.

  • सांडव्याची लांबी : 55 मीटर

  • डावा कालव्याची लांबी : 9.800 किलोमीटर

  • चार गावांचे सिंचन क्षेत्र : 506 हेक्‍टर

जिल्हाधिकाऱ्यांनाच वारसदार व्हावे लागेल

आपत्ती निवारण व व्यवस्थापन अंतर्गत जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या दोन पोकलेन व दोन जेसीबीद्वारे हालचिंचोळी तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेता येण्यासारखे आहे. जिल्हाधिकारी हे प्रशासन प्रमुख असल्याने त्यांनी यासाठी कागदी घोडे नाचविण्याची गरजच नाही. यंत्रणा अधिग्रहीत करून हे काम तातडीने व्हावे. 1994 मध्ये वैरागजवळील हिंगणी-पानगाव तलाव व चांदणी (ता. बार्शी) तलावास मोठ्या भेगा पडल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये आष्टी (ता. मोहोळ) तलावाच्या भरावातून एक माणूस जाईल इतकी मोठी भेग पडली होती. या तलावाची मालकी जलसंपदा विभागाकडे होती, त्यामुळे त्या विभागाकडून तातडीने निधी मिळाल्याने या तलावांची दुरुस्ती झाली. परंतु बेवारस हालचिंचोळी तलावाचा वारसदार कोणीच नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनाच हे काम करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com