मधमाशांचे गुंजन! पाहा तुरीच्या पिकात होतेय नैसर्गिक परागीभवन | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधमाशांचे गुंजन!
मधमाशांचे गुंजन! पाहा तुरीच्या पिकात होतेय नैसर्गिक परागीभवन

मधमाशांचे गुंजन! पाहा तुरीच्या पिकात होतेय नैसर्गिक परागीभवन

sakal_logo
By
मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या तुरीच्या पिकात सध्या मधमाशांचे (Honeybees) गुंजन ऐकावयास मिळत आहे. फुलांमधील मकरंद गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या मधमाशांकडून फलधारणेसाठी उपयुक्त असे परागीभवन होत आहे. त्यामुळे यंदा तुरीचे उत्पादन वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

फलधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्‍यक क्रिया आहे. आणि ही क्रिया सध्या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या तुरीच्या पिकात पाहायला मिळत आहे. फुलांतील मकरंद पिणाऱ्या मधमाशा तुरीच्या उत्पादनवाढीस फायदेशीर ठरल्या आहेत. सध्या सगळीकडे फुलांनी बहरलेल्या तुरीच्या पिकांमध्ये मधमाशांचे गुंजन ऐकायला येत आहे. या फुलांवरून त्या फुलांवर मकरंद गोळा करण्यासाठी आलेल्या मधमाशा शेतकऱ्यांना उपयोगी ठरल्या आहेत. पिकाचे उत्पादन वाढीसाठी सध्या मधमाशीपालन ही संकल्पना सुरू झाली आहे. मात्र पर्यावरणाचे संतुलन राखले जात असलेल्या भागातील पिकांमध्ये नैसर्गीक पद्धतीने मधमाशा मोठ्या संख्येने येत आहेत.

हेही वाचा: मंदिर समितीच्या 'या' निर्णयामुळे झाले फुलांचे भाव मातीमोल!

खरिपातील तूर पीक सध्या कळी, फुले येण्याच्या अवस्थेत आहे. फुलांचे फळात (शेंगात) रूपांतर होण्यासाठी परागीभवन होणे अत्यंत गरजेचे आहे. हे परागीभवन वारा व पाण्यामार्फत थोड्याफार प्रमाणात होत असले तरी मोठ्या प्रमाणात परागीभवन होण्यासाठी मधमाशांची गरज असते. या मधमाशा मकरंद गोळा करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर बसत असतात. त्यावेळी मधमाशा या परागकणांच्या वाहक म्हणून काम करतात. तेव्हा मधमाशांकडून परागकणांचे स्थलांतर होत असते. एका फुलाचे नर पराग मधमाशांच्या मदतीने दुसऱ्या झाडाच्या फुलाच्या बीजांड म्हणजे मादी फुलांपर्यंत पोचल्यावर त्यांचा संयोग होऊन फलधारणा होते. विविधरंगी फुलांनी तुरीच्या बहरलेल्या पिकात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे कीटक मकरंद गोळा करण्यासाठी आल्याचे चित्र दिसत आहे. तुलनेत मधमाशांची संख्या प्रचंड आहे. लहान व मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या मधमाशा तुरीच्या फुलांवर बसून मकरंद गोळा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने परागीभवनास मोठी चालना मिळत आहे. रंगीबेरंगी फुलांवर गुंजन करणाऱ्या मधमाशा व फुलपाखरांचे दृश्‍य नयनरम्य असते. खासकरून तुरीसारख्या कडधान्य वर्गीय पिकात फुलोरा अवस्थेत जर मधमाशा फिरकल्या नाहीत तर खते व औषधे देऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तुरीच्या पिकात मधमाशा याव्यात म्हणून मधमाशांना हानिकारक असलेल्या औषधांचा वापर टाळू लागले आहेत.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

परागीकरण प्रक्रियेत विविध घटकांपैकी मधमाशा हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. मधमाशांच्या माध्यमातून नैसर्गीकरीत्या होणाऱ्या परागीभवनामुळे उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ होते.

- डॉ . शरद जाधव, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ

मधमाशांसाठी आम्ही तुरीच्या पिकांवर विषारी कीटकनाशक फवारत नाही.

- संजय रानरुई, शेतकरी, आढीव, ता . पंढरपूर

परागीभवन चांगले होण्यासाठी मधमाशांची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांनी खासकरून गळीत धान्य व कडधान्याच्या पिकांमध्ये मधमाशा जास्त येण्यासाठी मधमाशांना हानिकारक असलेल्या कीटकनाशकांचा वापर टाळावा.

- डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरणाचे अभ्यासक, अकलूज

loading image
go to top