esakal | पंढरपूरकरांना दिलासा! कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत निम्म्याने घट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंताग्रस्त असलेल्या पंढरपूरकरांना आता काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे.

पंढरपूरकरांना दिलासा! कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत निम्म्याने घट

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : वाढत्या कोरोना (Covid-19) संसर्गामुळे चिंताग्रस्त असलेल्या पंढरपूरकरांना (Pandharpur) आता काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्या आता निम्म्याने कमी झाली आहे. ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा (Lockdown) पॉझिटिव्ह (सकारात्मक) परिणाम आता दिसू लागला आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी ग्रामीण भागात राबवलेला पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे.

हेही वाचा: जिल्ह्याला अजून हवेत 57 लाख डोस! 24.75 लाख व्यक्‍ती वेटिंगवरच

मागील दीड - दोन वर्षामध्ये कोरोनाचा पंढरपूर शहर व तालुक्‍याला मोठा फटका बसला. त्यानंतरही ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात होती. यावर प्राभावी उपाययोजना करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहापेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांची माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र तयार केले. त्यानुसार प्रांताधिकारी गुरव यांनी पहिल्या टप्प्यात 21 गावांमध्ये 14 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. या लॉकडाउनला संबंधित ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला. 14 दिवसांच्या लॉकडाउननंतर दैनंदिन शंभरी पार गेलेली रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 7 गावांमध्ये लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर आता रुग्णसंख्येत निम्म्याने घट झाली आहे. सोमवारच्या (ता. 6) आकडेवारीनुसार, पंढरपूर तालुक्‍यात फक्त 44 तर शहरामध्ये 8 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने पंढरपूरकरांना दीड वर्षानंतर प्रथमच दिलासा मिळाला आहे. शहर व तालुक्‍यात आतापर्यंत 32 हजार 650 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 31 हजार 414 जण बरे झाले आहेत तर सुमारे 600 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे तालुक्‍यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे अशा 28 गावांमध्ये सुरवातीला लॉकडाउन जाहीर करून तेथील रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांना यश आले. दैनंदिन शंभरीपार गेलेली रुग्णसंख्या आता निम्म्यावर आली आहे. लोकांनीही प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. लवकरच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

- गजानन गुरव, प्रांताधिकरी, पंढरपूर

loading image
go to top