सावध व्हा! मी थकलोय, 166 वर्षांचा म्हातारा झालोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावध व्हा! मी थकलोय, 166 वर्षांचा म्हातारा झालोय
सावध व्हा! मी थकलोय, 166 वर्षांचा म्हातारा झालोय

सावध व्हा! मी थकलोय, 166 वर्षांचा म्हातारा झालोय

केत्तूर (सोलापूर) : मी ब्रिटिशकालीन (British) डिकसळ पूल बोलतोय... होय मी थकलो आहे...माझे वय आता 166 वर्षे झाले आहे... 40 वर्षे पाण्याखाली राहिलो आहे... मला भगदाडे पडू लागले आहेत... मी आता कमकुवत झालो आहे... ढासळू लागलो आहे... आता जड वाहतूक सहन होत नाही... आतातरी सावध व्हा... मी कधी निखळून पडेन हे मलाही समजणार नाही. म्हणून म्हणतोय माझे ऐका आणि नाही ऐकले तर तुमचेच दळणवळण बंद होईल... ढासळलो तर तुमचीच जीवित हानी होईल... माझ्या अंगावरून जड वाहतूक नेऊ नका म्हणून प्रशासनाने प्रतिबंध घातले पण तरीही तुम्ही ऐकत नसल्याने आता मीच तुम्हाला सावध करतोय...

हेही वाचा: माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?

1855 साली बांधकाम झालेला मी ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झालो असून, गेली पंधरा वर्षे झाली जड वाहतूक बंद करण्याबाबत कागदी घोडे नाचवले जात आहेत; मात्र जड वाहतुकीत तसूभरही फरक पडला नाही. त्यामुळे आता मला मोठा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या हद्दीवर (कोंढार चिंचोली, ता. करमाळा व डिकसळ ता. इंदापूर) असलेला मी पुनर्वसित गावांना जोडणारा दुवा आहे. प्रशासनाने 'जड वाहतुकीस बंदी' असे फलक लावले, त्यानंतर वाहतुकीस अडथळे तयार केले पण सर्व व्यर्थच. फलकाकडे दुर्लक्ष केले, लावलेले अडथळे काढले, पर्याय शोधले पण वाहतूक ही चालूच ठेवली आहे. आता मला भगदाडे पडू लागली आहेत. दगडांचे गिलावे निखळू लागले आहेत. त्यामुळे आता तरी जड वाहतूक बंद व्हावी, अशी माझी तळमळीची विनंती आहे.

उजनी धरणाच्या पुनर्वसनानंतर रेल्वेमार्गावर रस्ते वाहतुकीसाठी मार्ग म्हणून मला तयार करण्यात आले होते. तीन- चार वर्षांपूर्वी कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली होती, त्यावेळी प्राचीन असलेल्या माझेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते व 'हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे', अशा सूचना माझ्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: मैत्रिणीकडे गेलेली तरुणी परतलीच नाही! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी

माझी ही अवस्था पाहून कोंढार चिंचोली (ता. करमाळा) येथील माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र सरकारी बाबूंनी नेहमीप्रमाणे पाहणी केली, संबंधितांना पत्रव्यवहार करू म्हटले, पण प्रत्यक्षात कारवाई नसल्याने आता मी पडल्यावर निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

loading image
go to top