esakal | बणजगोळमध्ये फुलली सेंद्रिय पेरूची बाग ! पहिल्याच वर्षी आठ टन उत्पादन

बोलून बातमी शोधा

Guava
बणजगोळमध्ये फुलली सेंद्रिय पेरूची बाग ! पहिल्याच वर्षी आठ टन उत्पादन
sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : बणजगोळ (ता. अक्कलकोट) येथील पाटील बंधूंनी केवळ सेंद्रिय पद्धतीचा वापर करत दर्जेदार पेरूची बाग फुलविली आहे. केवळ नऊ महिन्यांची बाग असूनही योग्य व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करत 7 ते 8 टन उत्पादन मिळविण्याची किमया साधत आहेत. आता या पेरूची त्यांनी हैदराबादच्या बाजारात विक्री सुरू केली आहे. 25 रुपये दराने विक्री होत असून, अवघ्या दोन एकरांत पहिल्याच वर्षी उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाणार आहे.

बणजगोळ येथील मल्लिनाथ, सिद्धाराम, श्रीशैल व प्रथमेश पाटील ही चार भावंडं मिळून एकूण वीस एकर शेती पाहात आहेत. त्यातील दोन एकरावर पश्‍चिम बंगाल येथील तयार झालेली जी -विलास जातीची पेरूची रोपे बार्शी येथील शेतकरी बांधवांकडून आणून जुलै 2020 रोजी लागण केली. त्याला जीवामृत, गोमूत्र फवारणी, योग्य मशागत, खत, वेळेवर पाणी, नियोजनपूर्वक छाटणी व शेंडा मारणे आदी कामे केली आहेत. त्यातून नऊ महिन्यांत दर्जेदार रसरशीत फळे तयार झाली आहेत. त्याची आता हैदराबाद येथे मार्केटिंग सुरू असून प्रतिकिलो 25 रुपये एवढा दर मिळत असल्याने बाग चांगली फायद्यात आली आहे.

हेही वाचा: लसीकरणाविना परतताहेत नागरिक ! लस उपलब्ध नसल्याने आज आणि उद्या नाही लसीकरण

90 टक्के गर व 10 टक्केच बी असे असलेले चांगले निरोगी फळ तयार झाले आहे. आणखी महिनाभर या बागेतील पेरू नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. जीवामृत व गोमूत्र यासाठी सहा गायी, तीन बैल तसेच म्हशी सांभाळत आहेत. त्यातून त्यांना पेरू व आणखी दोन एकर ऊस फक्त सेंद्रिय पद्धतीने घेणे शक्‍य होत आहे. एकंदरीत चांगले सुधारित वाण वापरून योग्य मशागत व पिकांचे संगोपन करून लोकांना निरोगी फळ सेंद्रिय पद्धतीने पिकवून चांगला नफा मिळवू शकतो, हे या पाटील बंधूंनी दाखवून दिले आहे.

आता पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस राहिले नाहीत. काळाबरोबर शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान व शेती पद्धती माहिती करून घेणे आवश्‍यक आहे. लक्षपूर्वक व योग्य नियोजन केल्यास सेंद्रिय शेती हमखास नफा मिळवून देऊ शकते. शेतकरी बांधवांनी खचून न जाता हिमतीने शेती करावी व कष्टाचा मार्ग स्वीकारावा.

- मल्लिनाथ पाटील, शेतकरी, बणजगोळ

राजशेखर चौधरी