esakal | कोरोना रुग्णांसाठी धावला विठुराया ! उभारणार दोन भक्त निवासात 200 बेडचे कोव्हिड सेंटर

बोलून बातमी शोधा

Bhakt Niwas
कोरोना रुग्णांसाठी धावला विठुराया ! उभारणार दोन भक्त निवासात 200 बेडचे कोव्हिड सेंटर
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचा संकटकाळ सुरू झाल्यावर मागील वर्षात श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीने लोकांना अनेक माध्यमातून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून मदतीचा मोलाचा हात दिला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मंदिर समितीने वेदांत आणि व्हिडिओकॉन ही सुमारे दोनशे बेड असलेली भक्त निवासे कोरोना रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एक प्रकारे विठुरायाच पुन्हा लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून आला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहिल्याने भाविकांकडून देणग्या मिळू शकल्या नाहीत. अशाही परिस्थितीत मंदिर समितीने मानवतेच्या भूमिकेतून अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेतल्याने एक प्रकारे विठुरायाच मदतीसाठी धावून आला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा विस्फोट ! वीस दिवसांत रुग्णसंख्या चौपट

मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर मंदिर समितीने अनेक माध्यमातून लोकांना मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंदिर समितीने एक कोटी रुपयांचा निधी दिला. शहरातील सुमारे पंधराशे निराधार नागरिकांना पाच महिने दिवसातून दोन वेळा भोजन व्यवस्था केली. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च झाला. सुमारे साडेअकरा लाख रुपये खर्च करून पंढरपूर पोलिसांच्या मदतीसाठी 50 कमांडोज उपलब्ध करून दिले. उपजिल्हा रुग्णालयास सुमारे नऊ लाख रुपये खर्च करून तीन हाय फ्लो ऑक्‍सिजन मशिन दिल्या. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली.

देशातील लॉकडाउन घोषित झाल्यानंतर परराज्यातील मजुरांना एक महिना वेदांत आणि व्हिडिओकॉन भक्तनिवास येथे निवास व भोजन व्यवस्था करून दिली. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च केले. उपजिल्हा रुग्णालयासाठी सुमारे 85 हजार रुपये किमतीचे 500 पीपीई किट उपलब्ध करून दिले.

हेही वाचा: तिढा अकरावी प्रवेशाचा ! मूल्यांकनानंतरच प्रवेश; सायन्ससाठी होईल अंतर्गत चाचणी

बार्डी येथील रानगायींना दोन महिने चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले. पंढरपूर शहरातील भटक्‍या जनावरांना व गाईंना दोन महिने हिरवा चारा दिला. त्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च केले.

याशिवाय पंढरपूर नगरपालिकेला सुमारे आठ महिने रुग्णवाहिका वापरासाठी दिली. पंढरपूर नगरपालिकेला विविध संवर्गातील 25 कर्मचारी तीन महिने उपलब्ध करून दिले. पंढरपूर शहरातील कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी सहा महिने मोफत निवास व्यवस्था केली.

शहरातील नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी एमटीडीसी भक्त निवास आणि वेदांत - व्हिडिओकॉनमधील 45 खोल्या दिल्या. कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्‍टरांची राहण्याची व्यवस्था केली.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागल्याने मंदिर समितीने वेदांत आणि व्हिडिओकॉन ही दोनशे बेड असलेली भक्त निवासे प्रशासनाला मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी या संदर्भातील लेखी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिला आहे.