esakal | कोरोनाबाधित आजोबाच्या मृत्यूची गावभर चर्चा ! मात्र कोरोनाशी झुंज देऊन ते पोचले गावात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनाबाधित आजोबाच्या मृत्यूची गावभर चर्चा ! मात्र कोरोनाशी झुंज देऊन ते पोचले गावात

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना (Covid-19) चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे घरात घबराट पसरली... त्यातच आरटी-पीसीआरमध्ये स्कोअर वीस आल्याने उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले... मात्र, इकडे गावात त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली. परंतु, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्या रुग्णाने कोरोनावर मात केली अन्‌ तो घरी सुखरूप परतला. (The patient at Bhalwani overcame the corona on the strength of indomitable will)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur By-election) रणधुमाळीनंतर मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सर्वसामान्य नागरिक याला निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय नेत्यांना जबाबदार धरत आहेत. तालुक्‍यामध्ये ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांना तालुक्‍यामध्येच सहजासहजी उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण सांगली, मिरज, (Miraj) इस्लामपूर, पुणे, (Pune) सोलापूर या भागात उपचारासाठी गेले आहेत.

हेही वाचा: इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

अशा परिस्थितीत भाळवणी येथील 60 वर्षीय आजोबाला कोरोनासदृश आजाराची लक्षणे जाणवू लागल्यावर तात्पुरता उपचार करून ते घरी थांबले. परंतु या आजाराची व्याप्ती वाढू लागली असतानाच आरटी-पीसीआर चाचणी केली. त्यात स्कोअर 20 आला. कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे दारात असलेली मुकी जनावरे जतन करण्याबरोबरच कोरोनामुक्त करण्यासाठी घरच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात 26 एप्रिल रोजी दाखल केले. उपचार सुरू असताना गावामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली. मात्र, रुग्णालयात आजोबा उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते.

दरम्यान, दहा दिवसांचे उपचार घेऊन 6 मे रोजी आजोबा हे आपल्या घरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुखरूप पोचले आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवलेल्यांची चांगलीच गोची झाली. आजोबा कोरानामुक्त झाल्याने गावात समाधानाचे वातावरण दिसून आले.

हेही वाचा: कोरोनाची ऐशीतैशी ! मांगूर मासे लुटण्यासाठी कंबर तलाव परिसरात झुंबड

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर होणाऱ्या उपचार व त्रासाला नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांशी रुग्णांची भीतीने गाळण उडाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या वतीने पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्णांना तालुक्‍यामध्येच बेड उपलब्ध करण्याच्या दृष्टीने समुपदेशन करणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे, त्या ठिकाणी त्या रुग्णाला उपचारासाठी पाठवल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण तालुक्‍यात कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीला रुग्णांबरोबर नातेवाइकांचीही ससेहोलपट होऊ लागल्यामुळे रोगापेक्षा उपचारच महाग होऊ लागला आहे.