esakal | माढा स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार तीनच कर्मचाऱ्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

माढा स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार तीनच कर्मचाऱ्यांवर

बँकेतील कामकाजासाठी तासन् तास वेळ वाया जात असल्याने ग्राहकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

माढा स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार तीनच कर्मचाऱ्यांवर

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर): माढा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचा (state bank of India in madha) संपूर्ण कारभार फक्त तीनच कर्मचाऱ्यांवर (only three employees) सुरू असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. बँकेतील कामकाजासाठी तासन् तास वेळ वाया जात असल्याने ग्राहकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (state bank of India in madha has only three employees)

हेही वाचा: उपळाई बुद्रूक येथून मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न 

राष्ट्रीयकृत बँक असल्याने शासकीय कर्मचारी, वयोवृद्ध महिला, पुरुष, शेतकरी असे माढा परिसरातील मोठ्या प्रमाणावर या बँकेचे ग्राहक असून, दररोज शेतकऱ्यांचे जुनी कर्जखाती अद्यावत करणे, नवीन पीककर्ज देणे, निराधार मानधन वितरण करणे, तसेच ऑनलाइनच्या इतर कामकाजासाठी या शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. परंतु गेली काही दिवसापासून या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याने, ग्राहकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सध्या बँकेत शाखा अधिकाऱ्यांसह इतर दोनच कर्मचारी बँकेत कार्यरत असल्याने, पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी दिवसभर वाट पाहावी लागते. तर बँकेतील इतर कामकाजासाठी कर्मचारी नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हातीच परत जावे लागत आहे.

हेही वाचा: उपळाई बुद्रूकच्या जंगलाला आग ! दोनशे एकर परिसर बाधित; आमदार शिंदेंच्या तत्परतेमुळे विझला वणवा

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या शाखेतील काही कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त तर काही जणांची बदली झालेली आहे. बँकेचा कारभार पाहण्यासाठी रखवालदारसह एकूण 9 पदे मंजूर आहेत. परंतु सध्या शाखाधिकारी, रखवालदार व इतर दोनच कर्मचाऱ्यावर संपूर्ण बँकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना 'एक ना अनेक' कामांसाठी तासन् तास बँकेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी होत आहे. त्यामुळे तातडीने या शाखेत कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: बेभरवशाची नोकरी सोडून उपळाई येथील तरुण कमावतोय गांडूळ खत निर्मितीतून महिन्याला लाखो रुपये ! 

स्टेट बँकेच्या माढा शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, एटीएम व इतर ऑनलाइनच्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे कर्मचाऱ्यांची सोय करून नागरिकांची हेळसांड थांबवावी.

- क्रांतिसिंह शिवाजी माने, ग्राहक- माढा.

बँकेतील रिक्त पदावर आठ ते दहा दिवसातच कर्मचारी उपलब्ध होतील. तरीदेखील ग्राहकांनी 'योनो' या डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा. जेणेकरून बँकेत गर्दीही होणार नाही. व ग्राहकांचा वेळही वाया जाणार नाही.

- एम.एस.पाटील, शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

बँकेत अपुरे कर्मचारी असल्याने, इतर कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तातडीने सोय करावी.

- श्रीकृष्ण डुचाळ, ग्राहक, उपळाई बुद्रुक

loading image