esakal | दर तासाच्या कामाचा द्या अहवाल ! आयुक्तांचा फतवा; कामगार संघटनेचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

P. Shivshankar

दर तासाच्या कामाचा द्या अहवाल! आयुक्तांचा फतवा; कामगार संघटनेचा विरोध

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

महापालिकेतील कामे वेळेवर मार्गी लागावीत व यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कर्मचाऱ्यांकडून दर तासाच्या कामाचा आढावा मागितला आहे.

सोलापूर : महापालिकेतील कामे वेळेवर मार्गी लागावीत व यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने आयुक्‍त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी कर्मचाऱ्यांकडून दर तासाच्या कामाचा आढावा मागितला आहे. याला महापालिका कामगार संघटना कृती समितीने तीव्र विरोध केल्याने महापौरांनी मंगळवारी (ता. 13) यासंदर्भात प्रशासन व कामगार संघटनेची बैठक बोलावली आहे. (The Solapur Municipal Corporation Commissioner ordered to report the work every hour)

हेही वाचा: दरोड्यातील संशयित आरोपीचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

"महापालिकेचे काम अन्‌ सहा महिने थांब' असे सोलापूर महापालिकेसंदर्भात उपहासात्मक बोलले जाते. येथील निर्ढावलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली, हे वेगळे सांगायची गरज नाही. या कारणामुळे महापालिका बदनाम आहे. कामचुकार अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे लोकांची कामे होत नाहीत, फायलींचा वेळीच निपटारा होत नाही, हे हेरून आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी ई-ऑफिस (E-Office)) प्रणाली आणली. यामुळे काम कुठल्या टेबलवर प्रलंबित आहे, याची माहिती एका क्‍लिकवर समजते.

कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला वेसण घालण्यासाठी आयुक्तांनी महापालिकेतील कामाच्या प्रचलित पद्धतीला फाटा देऊन अनेक प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना टंकलेखन, संगणक हाताळता येत नाही अशांच्या परीक्षा घेण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले, मात्र आयुक्तांच्या या निर्णयाला कामगार संघटनेने विरोध केला. तिसऱ्यांदा घेतलेल्या परीक्षेवर बहिष्कार घातला. संघटनेच्या या दबावतंत्राला अजिबात भीक न घालता आयुक्तांनी आता आणखी एक पाऊल उचलले, ते म्हणजे आता कर्मचाऱ्यांनी दर तासाला केलेल्या कामाची माहिती गुगल कॅलेंडरवर द्यावयाची आहे. यासंदर्भातील सुधारित परिपत्रक आयुक्तांनी नुकतेच काढले आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना ही माहिती कशी भरावी यासंदर्भात प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

हेही वाचा: आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

महापौरांनी बोलाविली आज बैठक

आयुक्तांच्या प्रत्येक तासाच्या कामाच्या आढाव्यासंदर्भात काढलेल्या फतव्याचा धसका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी याबाबत कामगार संघटनेकडे तक्रार केली. यावर संघटनेने महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेता शिवानंद पाटील यांना साकडे घातले. त्यानुसार महापौरांनी मंगळवारी दुपारी चार वाजता प्रशासन व कामगार संघटनेची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याविषयी उत्सुकता आहे.

कर्मचाऱ्यांसंदर्भात आयुक्तांनी नवनवीन नियमावली आणण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. गुगल कॅलेंडरसंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे, अशी आमची मागणी आहे.

- अशोक जानराव, अध्यक्ष, महापालिका कामगार संघटना कृती समिती

loading image