इंदापुरातील दोघांनी यू-ट्यूबवर पाहिला व्हिडिओ! त्यानंतर सुरु केले महिलांचे चैन स्नॅचिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग
इंदापुरातील दोघांनी यू-ट्यूबवर पाहिला व्हिडिओ! त्यानंतर सुरु केले महिलांचे चैन स्नॅचिंग

इंदापुरातील दोघांनी YouTube वर पाहिला व्हिडीओ! प्रभावित होऊन महिलांचं चेन स्नॅचिंग

सोलापूर : दुचाकीवरील महिलांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून हा मार्ग निवडणारे दोघेही गोतोंडी (ता. इंदापूर) येथील आहेत. अनिल शंकर नलवडे व राजेंद्र दिनकर बागडे अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा: माजीमंत्री सावंत म्हणाले..! शिवसेनेचा मुख्यमंत्री, तरीही अर्थसंकल्पात दहा टक्‍केच निधी

इंदापुरातून चोरीच्या उद्देशाने निघालेल्या त्या दोघांचा पोलिसांनी खूप लांबून पाठलाग सुरू केला. जुना पूना नाक्‍याजवळील गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी होईल आणि त्याचवेळी त्यांना पकडता येईल, यादृष्टीने सापळा रचला. त्यानुसारच त्यांना पकडले आणि त्यांच्याकडील बॅग तपासली. त्यावेळी बॅगेत एक गुप्ती, चार जिवंत काडतुसे असलेली बंदूक आढळली. त्यांच्याजवळील आणि तीन-चार सराफांकडून पोलिसांनी सात लाख 78 हजार 600 रुपयांचे दागिने हस्तगत केले. एप्रिलमध्ये संबंधित महिलांना ते दागिने परत केले जातील. ही कामगिरी पोलिस उपायुक्‍त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलिस नाईक शंकर मुळे, संदीप जावळे, संतोष येळे, सुहास अर्जुन, अभिजित धायगुडे, उमेश सावंत, राजू मुदगल, सतीश काटे, अंकुश भोसले, संतोष मोरे, इमाम इनामदार, अजय पाडवी, विजय वाळके, महेश शिंदे, तात्या पाटील, राजकुमार पवार, कुमार शेळके, अमोल कानडे, समर्थ शेळवणे, वसीम शेख, अर्जुन गायकवाड, संजय काकडे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: सीमावाद! सोलापूर, अक्‍कलकोट आमचेच, बेळगाव, निपाणी, कारवारही सोडणार नाही

दोन वर्षांपासून सुरू केली चोरी
गोतोंडी (ता. इंदापूर) येथील अनिल शंकर नलावडे व राजेंद्र दिनकर बागडे हे दोघे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. राजेंद्रची परिस्थिती गरीब तर अनिल हा आयटीआय करूनही बेरोजगारच होता. अनिलने यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहिला आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार सुरू केला. दोन वर्षांपासून त्यांनी सोलापूर शहरात वेळा तर इंदापूर तालुक्‍यातही अनेकदा चेन स्नॅचिंग केले. त्यासाठी त्यांनी एक धारदार हत्यार (गुप्ती) आणि पिस्टलचा वापर केला. एकट्या महिलांचा एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून निर्जनस्थळी आल्यानंतर त्यांच्या गळ्यातील दागिने त्यांनी हिसकावले. चोरी करताना त्यांनी दोन घटनांमध्ये किमान दिवसांचे अंतर ठेवले.

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक! निधीसाठी पदाधिकारी पालकमंत्री अन्‌ आमदारांच्या दारी

दीड महिन्यापासून मागावर होते पोलिस
दुचाकीवरील महिलांसह त्यावरील चिमुकल्यांच्या जीवाची पर्वा न करता ते चेन स्नॅचिंग करीत होते. काहीवेळा त्यांनी महिलांच्या दुचाकीला धक्‍का देऊन खाली पाडून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने पोलिसांनाही शोध लागत नव्हता. पण, पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे व सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके नेमली. श्री. शिंदेंच्या पथकाने त्यांचा येण्याजाण्याचा मार्ग शोधला. दीड महिन्यापासून त्यासंदर्भातील अभ्यास करून टोल नाक्‍यांवरील फुटेज पडताळले. त्यानंतर ते कोणत्या मार्गाने यायचे आणि जायचे, याची माहिती मिळविली.