...तरच कोरोना रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल !

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळा बाजार रोखण्याची गरज निर्माण झाली आहे
Remdesivir
Remdesivir Media gallery

माळीनगर (सोलापूर) : रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा (Remdesivir) काळाबाजार रोखण्यासाठी ती अवैधपणे नेमकी कोठून उपलब्ध होतात, याचा मुळाशी जाऊन तपास करण्याची गरज आहे. एवढेच नाही तर काळ्याबाजारात सापडलेली रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन्स ओरिजनल आहेत की बनावट, याचा शोध घेण्यासाठी त्याची शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी करायला हवी, तरच कोरोना (Covid-19) रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळ थांबेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. (There is a need to curb the black market of remdesivir injections)

अकलूज पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई करून रेमडेसिव्हिरचा काळाबाजार उघडकीस आणला. ही इंजेक्‍शन्स 30 ते 45 हजार रुपयांस विकणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वास्तविक, शासनाने या इंजेक्‍शनच्या एका व्हायलची (बाटली) किंमत 1200 ते 1400 रुपये निश्‍चित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या इंजेक्‍शन वाटप व वितरणाचे नियंत्रण संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. कोणत्या मेडिकलला किती इंजेक्‍शनचा पुरवठा केला, याचा तालुकानिहाय गोषवारा जिल्हा स्तरावरून होत आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांच्या माहितीसाठी त्याची यादी जाहीर केली जात आहे. तरीसुद्धा काळ्याबाजारात ही इंजेक्‍शन कोठून येतात, याचा उलगडा होणे आवश्‍यक आहे.

Remdesivir
इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

न्यूमोनियाची लक्षणे व ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा उपयोग होतो. रेमडेसिव्हिर कधी द्यायचे, याचे नियम निश्‍चित करण्यात आले आहेत. रुग्णाला जाणवणारी कोरोनाची लक्षणे, ऑक्‍सिजन पातळी, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी, रुग्णाचे वय व इतर सर्व वैद्यकीय अहवाल तपासल्यावरच गरज असल्यास रेमडेसिव्हिरचा वापर केला जातो. त्यासाठी रुग्णाचा सीटी स्कोअर, ऑक्‍सिजन पातळीचे प्रमाण याचा उल्लेख प्रिस्क्रिप्शनवर करणे बंधनकारक आहे. रुग्णाला रेमडेसिव्हिर देण्यापूर्वी त्यांची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व सुविधांनी युक्त रुग्णालये, दिमतीला तज्ज्ञ डॉक्‍टरांची फौज यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अकलूजची ओळख अधोरेखित झाली आहे. माळशिरस तालुक्‍यासह जिल्हा व परजिल्ह्यातून कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर वापर केला जातो. त्याच्या तुटवड्यामुळे ते मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. त्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सांगेल ती किंमत द्यायला ते तयार होतात. काही रुग्णांच्या नातेवाइकांनी तर बारामतीतून काळ्या बाजारातून रेमडेसिव्हिर आणल्याचे समजते. मात्र, पॅरासिटीमॉल भरून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार तेथे झाल्याची चर्चा होती.

Remdesivir
कोरोनाबाधित आजोबाच्या मृत्यूची गावभर चर्चा ! मात्र कोरोनाशी झुंज देऊन ते पोचले गावात

इंजेक्‍शन ओरिजनल की डुप्लिकेट?

अकलूजमध्ये अनेक रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांचा समावेश लक्षणीय आहे. तरुणांच्या नातेवाइकांनी लाखो रुपये खर्चून रुग्ण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. परिणामी अशा मृत तरुणांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांची बायकापोरं निराधार झाली आहेत. त्यामुळे अकलूज परिसरातील मेडिकलमध्ये उपलब्ध झालेली इंजेक्‍शन्स व काळ्या बाजारातून आलेली इंजेक्‍शन्स कोणी खरेदी केली, कोणत्या रुग्णालयात व कुठल्या रुग्णांना कधी वापरली, त्याच्या विक्रीच्या पावत्या याबाबत अन्न व औषध प्रशासनाने तपशीलवार ऑडिट करणे गरजेचे आहे. यातून बाहेरून आणलेली व काळ्या बाजारात विकली जाणारी इंजेक्‍शन्स ओरिजनल की डुप्लिकेट आहेत, याचा शोध लागेल. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सोलापूरचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांना अनेकदा फोन केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com