esakal | महापालिकेची आरोग्य केंद्रे रामभरोसे, मात्र खासगी हॉस्पिटल्सवर कारवाई !
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची आरोग्य केंद्रे रामभरोसे, मात्र खासगी हॉस्पिटल्सवर कारवाई!

शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करीत महापालिका प्रशासनाने हॉस्पिटल्सना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा धाडल्या आहेत.

महापालिकेची आरोग्य केंद्रे रामभरोसे, मात्र खासगी हॉस्पिटल्सवर कारवाई!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospitals) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करीत महापालिका प्रशासनाने (Solapur Municipal Corporation) हॉस्पिटल्सना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा धाडल्या आहेत. फायर सिस्टिमची सक्‍ती केली. मात्र या सर्व्हेची सुरवात महापालिका हॉस्पिटलपासून होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचा विचार प्रशासनाने केला नाही. महापालिकेच्या प्रसूती केंद्रासह इतर प्रशासकीय इमारतींमध्ये कोणत्याच प्रकारची फायर सिस्टिम उपलब्ध नाही. महापालिकेचा हा कारभार म्हणजे "दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान अन्‌ स्वत: कोरडे पाषाण' असाच म्हणावा लागेल.

हेही वाचा: केंद्र सरकारच्या कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा काय फायदा?

कोरोना महामारीत विरार व पुणे येथे हॉस्पिटलला आग लागून रुग्णांचे जीव गेले होते. या घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील सर्वच महापालिकांना शहरातील हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मे महिन्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या 46 हॉस्पिटलचे महापालिका प्रशासनाने फायर ऑडिट केले होते. या सर्व्हेत 26 हॉस्पिटलमध्ये फायर सिस्टिम नसल्याचे आढळून आले. रुग्णांच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटल प्रशासनाने आठ दिवसांत फायर सिस्टिम बसवून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने दिली. जून महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हे झाला. यामध्ये 12 हॉस्पिटल्सना नोटिसा बजावण्यात आल्या. हे ऑडिट महापालिकेच्या आरोग्य केंद्रापासून सुरू होणे अपेक्षित होते. महापालिकेची इंद्रभवन व प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल यासह प्रसूतिगृह, आरोग्य केंद्रांमध्ये आजही फायर सिस्टिम उपलब्ध नाही. महापालिकेच्या इमारतीमध्ये कर्मचारी, अधिकारी यांच्यासह विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जी प्लस वन इमारतीमध्ये फायर गॅस लटकावून प्रशासनाने केवळ जबाबदारी झटकली आहे.

हेही वाचा: नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमांची चलती !

इलेक्‍ट्रिकल ऑडिटचीही नितांत गरज

हॉस्पिटल व इतर ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आग लागू नये याकरिता खास करून इलेक्‍ट्रिकल ऑडिटही तितकेच महत्त्वाचे आहे. हॉस्पिटलच्या परवानगी नियमावलीमध्ये या गोष्टींचाही समावेश आहे; मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही.

सोलापूर महापालिकेच्या इमारती, प्रसूतिगृह, कौन्सिल हॉल आदी सर्व ठिकाणी फायर सिस्टिम बसविण्याकरिता 1 कोटी 25 लाखांचा विकास आराखडा तयार आहे. चालू अंदाजपत्रकातून निधी मंजूर झाला आहे. या विषयाच्या ठरावाचा इतिवृत्तांत लेखापाल विभागाकडे अजून प्राप्त झाला नाही. निधीचा अभिप्राय मिळाला नसल्याने अद्याप फायर सिस्टिम बसविण्यात आली नाहीत. लवकरच या सर्व ठिकाणी फायर सिस्टिम बसविण्यात येतील.

- केदारनाथ आवटे, अग्निशामक विभाग प्रमुख

आकडे बोलतात

  • शहरातील हॉस्पिटलची संख्या : 450

  • सर्व्हे झालेल्या हॉस्पिटलची संख्या : 225

  • कोविडवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलची संख्या : 46

  • नोटीस पाठविलेल्या हॉस्पिटलची संख्या : 26

  • फायर सिस्टिम नसलेले हॉस्पिटल : 2

जीव गेल्यानंतर जाग येणार का?

शहरातील बहुमजली इमारती, बहुमजली हॉस्पिटल्स, मॉल्स आदींना परवानगी देताना अथवा परवाना नूतनीकरण करताना फायर सिस्टिम पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येते. मात्र महापालिका प्रशासनाकडून या नियमाची अंमलबजावणी पारदर्शीपणे होत नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, एखादा बळी गेल्यावरच यंत्रणा कामाला लागते. कोविड काळात मार्कंडेय रुग्णालयातील गॅस गळतीमुळे गॅस ऑडिट सुरू झाले. त्यानंतर नाशिक, मुंबई, पुणे येथील आगीच्या घटनेनंतर फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला.

loading image
go to top