esakal | केंद्र सरकारच्या कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा काय फायदा? 'बीएसएफ' केंद्राच्या इमारती दोन वर्षांपासून पडून
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्र सरकारच्या कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा काय फायदा?

सरकार बदललं की एखाद्या योजनेचं काय फलित होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणून टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील बीएसएफ

केंद्र सरकारच्या कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा काय फायदा?

sakal_logo
By
अभय दिवाणजी

सोलापूर : सरकार बदललं की एखाद्या योजनेचं काय फलित होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणून टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) (South Solapur Taluka) येथील बीएसएफ सेंटरच्या (BSF Center) योजनेबद्दल सांगता येईल. तब्बल 75 एकरवर वसलेलं हे केंद्र सध्या धूळखात पडून आहे. या ठिकाणाचा उपयोग व्हावा, ते वापरात यावे, तेथे काहीतरी योजना राबवावी असे वाटते. नव्या भरतीनंतर येथील बीएसएफ केंद्र सुरु होईल, असे संबंधितांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरनजीक टाकळी येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांचे केंद्र आणले होते. या योजनेसाठी 100 एकर जमिनीची गरज होती. परंतु टाकळीजवळील 75 एकर गायरान असलेली जमीन घेण्यात आली. या जागेसाठी केंद्रीय गृह विभागाने बाजारभावाप्रमाणे किंमतही मोजली. शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचेही अधीग्रहण करण्याची योजना होती. परंतु सुपीक जमिनी देण्यास शेतकरी तयार नव्हते. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी करीत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी स्थगिती आदेशही आणला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या नाहीत. दरम्यान, माळरान व गायरान अशी 75 एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. याठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची छावणी, कार्यालय, मेस, शाळा, निवासस्थाने अशा टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. यात एकूण 88 क्वार्टर्स आहेत. सुरक्षा रक्षकाचे केबिन, मोठी सुंदर स्वागत कमानही येथे उभारण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाकाळात क्वारंटाईन सेंटर म्हणून येथील इमारतींचा वापर करण्यात आला ही जमेची बाजू.

हेही वाचा: 'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक

श्री. शिंदे यांनी या योजनेसाठी केंद्राच्या अखत्यारितील पाच कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. सोलापूर शहरापासून 100-150 किलोमीटर परिसरात अथवा शेजारच्या राज्यात आपत्कालिन परिस्थितीत तसेच कायदा व सुरक्षेविषयक अडचणी आल्या तर नागरिकांच्या सोयीसाठी त्वरित सैन्यदल उपलब्ध करणे सोयीचे व्हावे म्हणून त्याचबरोबर टाकळी परिसरातील अर्थकारण बदलेल या उद्देशाने त्यांनी ही व्यवस्था केली होती. 2014 मध्ये येथील योजनेचे भूमिपूजन झाले. या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही आता दोन वर्षे झाली. सुरवातीच्या काही काळात जवानांची, त्यांच्या वाहनांची रेलचेल येथे असे. परंतु सध्या तर या ठिकाणी फक्त एक अधिकारी, चार कर्मचारी आहेत. लष्कराची दोन वाहने याठिकाणी उभी असलेली दिसतात. एका इमारतीतील केवळ एकाच निवासस्थानाचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. निवासस्थानासाठी बांधलेल्या इमारती, अन्य कार्यालयांच्या इमारती तशाच पडून आहेत. याठिकाणी राहणाऱ्यांच्या सोयीसाठी जलकुंभ, जलवाहिनी, शुद्धीकरण योजना, पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी अजूनही पडून आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रासाठीच्या इमारती तयार आहेत, नवे रिक्रुट (भरती) आल्यानंतर हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असे संबंधितांचे म्हणणे आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून काहीही हालचाल नसल्याने या ठिकाणचा वापर होण्याची अपेक्षा आहे.

...तर निधीचा होईल विनियोग

टाकळी येथे सीमा सुरक्षा जवानांसाठी तयार केलेल्या योजनेसाठी खर्च केलेल्या तसेच तब्बल पाच कोटींपर्यंत गुंतवून पडलेल्या निधीचा सध्यातरी काहीही उपयोग होत नसल्याचे दिसते. सीमा सुरक्षा दलाकडून लवकर वापर होणार नसेल तर सोलापूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हे ठिकाण असल्याने येथे एखादे सुसज्ज रुग्णालय, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, आयटी पार्क, केंद्र शासनाचे प्रशिक्षण केंद्र, राखीव पोलिस दलासाठी सुसज्ज केंद्र उभारले तर इतक्‍या मोठ्या निधीचा विनियोग होईल.

loading image
go to top