शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाविरुद्ध चार जिल्हाप्रमुखांनी ठोकला शड्डू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Raut, Tanaji Sawant, Ganesh Wankar

सक्रीय संघटनशैली अवलंबणारे शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सांवत यांच्यात सुंदोपसुंदी सुरू आहे. संपर्कप्रमुख सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, याबाबत तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून किंवा पीएकडून कोणाताही निरोप येत नाही. त्यांचा दौरा वर्तमानपत्रातूनच सेनेच्या स्थानिक नेत्यांना समजतो. यामुळे संपर्कप्रमुख आणि चारही जिल्हा प्रमुख यांच्यात समन्वय होत नाही.

शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाविरुद्ध चार जिल्हाप्रमुखांनी ठोकला शड्डू

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा नुकताच सोलापूरला खासगी दौरा झाला. या दौऱ्यावेळी खासदार राऊत यांना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. गणेश वानकर यांच्या निवासस्थानी पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धंनजय डिकोळे व संभाजी शिंदे या चारही जिल्हाप्रमुखांनी संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्याची चर्चा आहे. मात्र, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा दावा आहे की, हे केवळ स्नेहभोजन होते. कोणतीही बैठक नव्हती. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आजवर केलेल्या कामाबद्दल चर्चा झाली. शिवसेनेकडून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बैठका, मेळावे घेण्यात येत आहेत. शिवसंपर्क अभियानातून नव्या जुन्या शिवसैनिकांची मोटबांधणी सुरू आहे. याबद्दलची माहिती खासदार राऊत यांना देण्यात आली. मात्र, कोणाबद्दलही कसलीही तक्रार करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: आता विधान परिषदेसाठी इच्छुकांना आमदारकीचा मौका

मागील अनेक दिवसांपासून सोलापूर महापालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करावी की, स्वंतत्र लढावे यावर खल सुरू आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी मिळवून देणे, शिवसेनेच्या मतदारसंघातील तसेच प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून सहकार्य मिळविण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. अगदी प्रत्येक शिवसैनिकापर्यंत कोणाला प्रशासकीय कामकाजात अडचण येणार नाही, यासाठी संघटना काम करत आहे, याची माहिती खासदार विनायक राऊत यांना देण्यात आली. मात्र, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत हे जेव्हा सोलापूर दौऱ्यावर येतात याबाबतची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिली जात नाही. वर्तमानपत्रातील त्यांचा दौरा वाचूनच बैठका लावल्या जात आहेत. सोलापूरचे संपर्कप्रमुख हे संपर्कात नसतात ही सार्वत्रिक तक्रार आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते व संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यातील सुंदोपसुंदी वाढत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: मोठी बातमी ! महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश वानकर? पक्षाकडून पत्र आल्याची चर्चा

संपर्कप्रमुख संपर्ककक्षेच्या बाहेर

प्रा. तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील वाकाव (ता. माढा) येथील असले तरी निवासस्थान पुणे येथे आहे. कर्मभूमीही पुणे व पंरडा (जि. उस्मानाबाद) आहे. मनात आणले तर येथील शिवसैनिकांच्या प्रत्येक बैठकीला ते फिजीकली नसले तरीही ऑनलाइन उपस्थित राहू शकतात. अत्याधुनिक संपर्क यंत्रणेतून जगात कुठेही असले तरीही संपर्कात राहता येते. मात्र, तानाजी सावंत यांचा संपर्क होणे खरच कठीण आहे, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यांचा मोबाइल सतत "संपर्क' कक्षाच्या बाहेर असतो, अशीही चर्चा आहे. मोहोळ शहरात राजकीय वैमन्यस्यातून दोन शिवसैनिकांची हत्या झाली मात्र, अद्यापही त्या कुटुंबीयाना आधार देण्यासाठी संपर्कप्रमुख आले नसल्याचे मोहोळचे शिवसैनिक सांगतात.

loading image
go to top