esakal | तीर्थक्षेत्रांना जाणार कसे? कुर्डुवाडीहून नाही पंढरपूर, मिरज, कोल्हापूरकडे जाणारी एकही रेल्वे 
sakal

बोलून बातमी शोधा

Train

लॉकडाउनच्या काळात प्रवासी वाहतूक पूर्ण ठप्प होती. अनलॉकमध्ये काही विशेष प्रवासी गाड्यांना धावण्यासाठी परवानगी मिळाली. जिल्ह्यातील सोलापूरनंतर सर्वात महत्त्वाचे व मोठे असलेल्या कुर्डुवाडी स्थानकावरून फक्त 10 गाड्या अप-डाउन धावत आहेत. 

तीर्थक्षेत्रांना जाणार कसे? कुर्डुवाडीहून नाही पंढरपूर, मिरज, कोल्हापूरकडे जाणारी एकही रेल्वे 

sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : लॉकडाउननंतर कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी सध्या फक्त 10 विशेष अप व 10 विशेष डाउन गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर, मिरज व कोल्हापूरकडे जाणारी एकही रेल्वे सुरू केली नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूरकडे किमान एक विशेष गाडी त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. 

लॉकडाउनच्या काळात प्रवासी वाहतूक पूर्ण ठप्प होती. अनलॉकमध्ये काही विशेष प्रवासी गाड्यांना धावण्यासाठी परवानगी मिळाली. जिल्ह्यातील सोलापूरनंतर सर्वात महत्त्वाचे व मोठे असलेल्या कुर्डुवाडी स्थानकावरून फक्त 10 गाड्या अप-डाउन धावत आहेत. या गाड्या सोलापूर, मुंबई, लातूर या दिशेने धावतात. कुर्डुवाडीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे तसेच सांगोला, मिरज, कोल्हापूर याकडे धावणारी एकही रेल्वे सुरू झालेली नाही. त्यामुळे त्या भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कुर्डुवाडी व परिसरातील नागरिकांना कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, उपचारासाठी रुग्णांना मिरज येथे जावे लागते. परंतु सध्या गाड्या बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली आहे. या मार्गावरील किमान एखादी विशेष गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

मिरज, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात यासह इतर मागण्यांचे निवेदन रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना दिले आहे. गाड्या सुरू करून प्रवाशांची गैरसोय टाळावी. 
- विजयसिंह परबत, 
अभियंता, कुर्डुवाडी 

पंढरपूर, मिरज, कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे सुरू करून प्रवाशांची अडचण दूर करावी; अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. 
- हर्षद मोरे, 
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ, कुर्डुवाडी 

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्या 
मुंबई- बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेस (अप-डाउन), हैदराबाद - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), दिल्ली - बंगळूर कर्नाटक एक्‍स्प्रेस (अप-डाउन), मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्‍स्प्रेस (अप-डाउन), सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस (अप-डाउन), मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्‍स्प्रेस (अप-डाउन), लोकमान्य टिळक टर्मिनस - शालिमार कुर्ला एक्‍स्प्रेस (अप-डाउन), गदग - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), लातूर - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), पनवेल - नांदेड एक्‍स्प्रेस (अप-डाउन) यापैकी काही गाड्या दिवसा तर काही रात्रीचा प्रवास करतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image