सोलापूर शहराच्या हद्दीतील ‘ही’ 18 ठिकाणे धोक्याची! शांती चौकात 8 दिवसांत 3 ठार; सिग्नल खुजे, सिग्नलची वेळही धोक्याची; महिलेच्या मृत्यूनंतर चौकातील खड्डा बुजवला

शिवाजीनगर, सिंहगड कॉलेजसमोर, केगाव, बाळे ब्रिज, जुना पूना नाका, मडकी वस्ती, बस स्टॅण्ड, सात रस्ता, किनारा हॉटेलसमोर, पसारे वस्ती ते तळे हिप्परगा ब्रिज, जुना तुळजापूर नाका, मार्केट यार्ड चौक, जुना बोरामणी नाका, तानाबाना चौक ते आम्रपाली चौक आणि महालक्ष्मी मंदिर ते कोंडा नगर या १५ ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात.
solapur-akkalkot chowk

solapur-akkalkot chowk

sakal solapur

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील सर्वांत अपघातप्रवण क्षेत्र म्हणून शांती चौकाची ओळख बनू लागली आहे. शांती चौकात नावाला ‘शांती’ असली तरी प्रत्यक्षात तो मृत्यूला आमंत्रण देणारा ‘अशांती चौक’ ठरत आहे. गेल्या आठ दिवसांत अपघातात येथे तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. सिग्नलची उंची कमी, सिग्नलची वेळ असमतोल, रस्त्यावरचे खोल खड्डे, जड वाहनांची अमर्याद वर्दळ आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित उपस्थिती ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी २०० ते २५० अपघात होतात. त्यात सरासरी ७५ ते ८० जणांचा जीव जातो, अशी नोंद ‘आरटीओ’कडे आहे. शहरातील शांती चौक व मार्केट यार्ड चौक सर्वात घातक आहेत. त्याठिकाणी महिन्यात किमान तीन-चार जणांचा मृत्यू होतोच. मागील आठ दिवसांत शांती चौकात तिघांना जीव गमवावा लागला आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गांवर सोलापूर शहर हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) आहेत. रस्त्यालगत थांबलेली वाहने, अमर्याद वेग, सर्व्हिस रोडचा वापर नाही, घरी जाण्यासाठीचा शॉर्टकट, हेल्मेटविना दुचाकीस्वार, अशी त्यामागील कारणे आहेत.

दरम्यान, शांती चौकात नेहमीच अशांती असते. जड वाहनाने कट मारल्याने चालकांमध्ये सतत वाद होत असतात. दुसरीकडे त्या चौकात सिग्नल आहे, पण समोरील जड वाहने विशेषत: सिमेंट बल्करमुळे तो सिग्नल दिसतच नाही. सिग्नलची उंची खूप कमी आहे. त्याठिकाणी वाहनधारकांना थांबण्याचा वेळ ६० ते ९० सेकंदाचा तर रस्ता क्रॉस करण्याचा वेळ ३० सेकंदाचाच आहे. त्यामुळे गडबडीत सिग्नल ओलांडताना अपघात होतात. एक वाहतूक पोलिस त्याठिकाणी असतो, पण वाहनांच्या वर्दळीमुळे बाजूलाच थांबलेला असतो.

मुख्य अपघातप्रवण ठिकाणे...

  • सोलापुरातून बाहेर पडल्यावर सोलापूर-पुणे हायवेवर लगेचच मडकी वस्तीचा ब्लॅक स्पॉट लागतो. पुढे बाळे ब्रिज, शिवाजीनगर, केगाव ब्रिज आणि सिंहगड कॉलेजसमोरील रोडवर आतापर्यंत शेकडो लोकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.

  • मार्केट यार्ड, चंदन काटा आणि मुळेगाव क्रॉस रोड या ठिकाणी देखील सतत अपघात होतात.

  • जुना बोरामणी नाका, शांती चौक ते कोंडानगर (महालक्ष्मी मंदिराजवळ) हा रस्ता देखील खूपच धोकादायक आहे.

  • जुना तुळजापूर नाका, पसारे वस्ती, तळे हिप्परगा ब्रिज हा रोड देखील सर्वाधिक अपघाताचा आहे.

वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची १८ ठिकाणे

शिवाजीनगर, सिंहगड कॉलेजसमोर, केगाव ब्रिज, बाळे ब्रिज, जुना पूना नाका, मडकी वस्ती, बस स्टॅण्ड (छत्रपती शिवाजी महाराज चौक), सात रस्ता, किनारा हॉटेलसमोर, पसारे वस्ती ते तळे हिप्परगा ब्रिज, जुना तुळजापूर नाका, मार्केट यार्ड चौक, जुना बोरामणी नाका, तानाबाना चौक ते आम्रपाली चौक आणि महालक्ष्मी मंदिर ते कोंडा नगर या १५ ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. याशिवाय डी-मार्ट ते पर्ल गार्डन, शेळगी ब्रिज, मुळेगाव क्रॉस रोड येथेही नेहमीच अपघात होतात.

फक्त खड्डा भरल्याने जीव परत येत नाही

सोलापुरातील शांती चौकातून ३० ऑक्टोबर रोजी तेलगाव सीना (ता. उत्तर सोलापूर) येथील अरुण पंढरी जाधव पत्नीसोबत गावी निघाले होते. चौकातील वळणातील खड्डा त्यांना दिसला नाही. त्याचवेळी खड्ड्यातील खडीवरून दुचाकी घसरली आणि चौकातून वळण घेणाऱ्या बल्करखाली त्यांची पत्नी जयश्री पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आता तो खड्डा सिमेंट काँक्रिटने बुजविला आहे. मात्र, फक्त खड्डा भरल्याने गेलेला जीव परत येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com