esakal | शहरातील बंद घरांवर चोरट्यांचा वॉच! हाताला लागेल त्या वस्तूंची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील बंद घरांवर चोरट्यांचा वॉच!

शहरातील बंद घरांवर चोरट्यांचा वॉच! हाताला लागेल त्या वस्तूंची चोरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

मोबाईल, रोकड, घरगुती साहित्य, धान्य अशा हाताला लागेल त्या वस्तूंची चोरी वाढली आहे.

सोलापूर : शहरातील बंद घरांवर वॉच ठेवून चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून विशेषत: मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेतच चोऱ्या होऊ लागल्या आहेत. मोबाईल (Mobile), रोकड, घरगुती साहित्य, धान्य अशा हाताला लागेल त्या वस्तूंची चोरी वाढली आहे. 15 जुलैला शहरातील चार पोलिस ठाण्यांमध्ये अशा प्रकारचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. (Thieves are stealing by keeping a watch on closed houses in the city-ssd73)

हेही वाचा: 23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश

हौसे वस्तीत 77 हजारांची चोरी

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हौसे वस्ती परिसरातील सह्याद्री हायस्कूलसमोरील अश्‍विनी हनुमंत घोरफोड यांच्या घरातून चोरट्याने 77 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 68 हजारांचे सोन्या- चांदीचे दागिने आणि नऊ हजारांची रोकड चोरी झाल्याची फिर्याद घोरफोड यांनी पोलिसांत दिली. सासऱ्यांच्या दशविधीसाठी 10 जुलैला घरातील सर्वजण परगावी गेले होते. त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून चोरी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक बाबर हे पुढील तपास करीत आहेत.

खिडकीतून पळवले मोबाईल

एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरातील रमन नगरातील हत्तरके वीटभट्टीजवळ राहणाऱ्या सचिन शिवाजी हत्तरके यांच्या घरातून चोरट्याने मोबाईल पळवले. खिडकीत ठेवलेले दोन मोबाईल चोरट्याने पळविल्याची फिर्याद हत्तरके यांनी पोलिसांत दिली. सात हजार रुपयांचे दोन मोबाईल होते, असेही फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी पोलिसांत हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घ्यायला सुरवात केली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान कोलते दाम्पत्याला !

दुचाकीच्या डिकीतून पळवला मोबाईल

रेल्वेलाइन परिसरातील कोनापुरे चाळ येथील नीलेश श्रीनिवास संगेपाग हा तरुण दुचाकी रस्त्यालगत लावून नैसर्गिक विधीसाठी गेला होता. त्यावेळी चोरट्याने त्याच्या दुचाकीच्या डिकीतून 20 हजार रुपयांचा मोबाईल पळवला. ही घटना नूतन मराठी विद्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यालगत झाल्याची फिर्याद नीलेशने पोलिसांत दिली. पोलिस नाईक आरेनवरू हे पुढील तपास करीत आहेत.

बेलाटी येथे 15 हजारांची चोरी

बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील हरी लक्ष्मण काळे यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून 15 हजारांची रोकड चोरून नेली आहे. या प्रकरणी काळे यांनी सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार जोंधळे हे पुढील तपास करीत आहेत. ही घटना 14 जुलैला रात्री नऊ ते 15 जुलैच्या सकाळी सहा या वेळेत झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

loading image