esakal | मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान कोलते दाम्पत्याला !
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान कोलते दाम्पत्याला !

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे. त्या दिवशी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या शासकीय महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान यंदा श्री विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते (वय 66, रा. संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा) यांना मिळणार आहे. श्री. कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. आज मंदिरातील वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून त्यांची निवड करण्यात आली. (The couple got the honor of the official Mahapooja of Vitthal-Rukmini along with the Chief Minister-ssd73)

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे. त्या दिवशी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत "श्रीं'च्या शासकीय महापूजेच्या वेळी मानाचा वारकरी दर्शन रांगेतून निवडला जातो आणि त्या दाम्पत्यास शासकीय महापूजेत सहभागी होण्याची संधी दिली जाते. तथापि, कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता, आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात चोवीस तास पहारा देणारे वीणेकरी यांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण आठ वीणेकऱ्यांपैकी दोन वीणेकऱ्यांना मागील वर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पूजा करण्याची संधी मिळाली होती. तसेच चार वीणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते आणि बापू साळुजी मुळीक या दोन वीणेकऱ्यांपैकी चिठ्ठी टाकून केशव शिवदास कोलते यांची निवड करण्यात आली. वीणेकरी श्री. कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय देखील माळकरी आहेत.

वीणेकरी निवड प्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

loading image