सोलापूर शहरात यंदा नवरात्रोत्सव मिरवणुका पारंपरिक वाद्यातच! मिरवणुकीतील आवाज मोजण्यासाठी पोलिसांची १३ पथके; शहरात १८०० पोलिसांचा बंदोबस्त

‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना हृदयविकाराचा तर काहींना कानाचे विकार झाले आहेत. मिरवणूक मार्गांवरील रहिवाशांना, दवाखान्यातील रुग्णांना देखील त्याचा त्रास सोसावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिरवणुकांमध्ये आता ‘डीजे’ला परवानगी देण्यात आलेली नाही. गणेशोत्सवातील आदेश दुर्गादेवी मिरवणुकीसह अन्य मिरवणुकांसाठी देखील लागू करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सवCanva
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शक्तीदेवी नवरात्रोत्सव सांगता मिरवणूक आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देखील उद्या (गुरुवारी) शहरात विविध मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका काढल्या जाणार आहेत. डीजेमुक्त सोलापूर कृती समिती, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स असोसिएशन व शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मिरवणुकांमध्ये ‘डीजे’वर निर्बंध घालण्यात आले आहेत.

‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना हृदयविकाराचा तर काहींना कानाचे विकार झाले आहेत. मिरवणूक मार्गांवरील रहिवाशांना, दवाखान्यातील रुग्णांना देखील त्याचा त्रास सोसावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिरवणुकांमध्ये आता ‘डीजे’ला परवानगी देण्यात आलेली नाही. गणेशोत्सवातील आदेश दुर्गादेवी मिरवणुकीसह अन्य मिरवणुकांसाठी देखील लागू करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. २) सोलापूर शहरातील नऊ नवरात्रोत्सव सार्वजनिक मध्यवर्ती मंडळांअंतर्गत २३ मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. याशिवाय ७० मंडळांच्या त्यांच्या त्यांच्या भागात मिरवणुका निघणार आहेत. तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या २२ मंडळांकडून काढल्या जाणार आहेत.

दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन देखील होणार आहे. हे उत्सव शांततेत व आनंदात साजरे व्हावेत यासाठी शहरात ४७ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले असून नवरात्रोत्सवाच्या नऊ मध्यवर्ती मंडळांच्या ठिकाणी देखील बंदोबस्त असणार आहे. याशिवाय शहरात तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करीत असल्यास नागरिकांनी ‘डायल ११२’वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

१३ पथकांवर आवाज मोजण्याची जबाबदारी

नेहमीप्रमाणे सोलापूर शहरातील प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीतील आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी एकूण १३ पथके नेमली आहेत. त्यात एमआयडीसी पोलिस ठाणे, जोडभावी व जेलरोड पोलिस ठाणे, फौजदार चावडी, सदर बझार आणि विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन पथके असतील. याशिवाय सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक पथक असणार आहे.

सोलापूर शहरातील बंदोबस्त असा...

  • पोलिस उपायुक्त : ३

  • सहायक पोलिस आयुक्त : ७

  • पोलिस निरीक्षक : २१

  • सहायक पोलिस निरीक्षक-उपनिरीक्षक : ६७

  • पोलिस अंमलदार : १०२५

  • होमगार्ड : ६७७

  • एसआरपीएफ तुकडी : एक

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com