esakal | शेतकऱ्यांचे डोळे धरणांकडे! यंदा केवळ एक टक्का क्षेत्रात ऊस लागवड
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांचे डोळे धरणांकडे! यंदा केवळ एक टक्का क्षेत्रात ऊस लागवड

शेतकऱ्यांचे डोळे धरणांकडे! यंदा केवळ एक टक्का क्षेत्रात ऊस लागवड

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

धरणातील पाण्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी सावध भूमिका घेतल्याचे दिसते.

माळीनगर (सोलापूर) : उजनी (Ujani Dam) व नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याच्या उपलब्धतेमुळे सोलापूर जिल्हा (Solapur District) उसाचा आगार मानला जातो. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी असल्याने येथे ऊस लागवड देखील जास्त प्रमाणावर होते. मात्र, यंदा उजनी व नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने ऊस लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे धरणातील पाणीसाठ्याकडे लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस लागवड (Sugarcane cultivation) संथगतीने सुरू आहे. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 242 हेक्‍टर (एक टक्के) क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे. (This year, only one per cent area of sugarcane has been planted in Solapur district)

हेही वाचा: राज्यातील धरणांमध्ये केवळ 27 टक्केच पाणीसाठा !

यंदा उजनी धरण अजून मायनसमध्येच आहे. उजनीत वजा 8.08 टक्के पाणीसाठा आहे. नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा देवधर, गुंजवणी धरणात मिळून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दीड टीएमसी म्हणजे तीन टक्के पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र एक लाख 37 हजार 536 हेक्‍टर आहे. धरणातील पाण्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी सावध भूमिका घेतल्याचे दिसते.

पाऊस व शेतातील पाण्याच्या स्रोतांचा अंदाज घेत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड चालू केली आहे. को-86032, फुले-265 हे उसाचे वाण शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. काही शेतकऱ्यांनी जूनमध्येच 434 उसाच्या वाणाची लागवड केली आहे. पट्टा पद्धत (जोडओळ), पाच फुटी सरी, साडेतीन फुटी सरी या पद्धतींचा ऊस लागवडीसाठी शेतकरी अवलंब करीत आहेत. लागवडीसाठी शेताची बांधणी करायला एकरी साडेचार ते पाच हजार रुपये खर्च येत आहे. अनेक शेतकरी स्वतःचेच ऊस बेणे वापरत आहेत. काहींना बाहेरून बेणे विकत घ्यावे लागत आहे. बाहेरून बेणे घ्यायला शेतकऱ्यांना गुंठ्याला पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. पुनर्वसू नक्षत्रात गेली दोन-तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतात ओल असल्याने लागण उरकायला मदत होत आहे. ऊस लागवडीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

हेही वाचा: छंदातून फुलवली गच्चीवर बाग! उत्पन्नही सुरू; मिळतोय ऑक्‍सिजनही

ऊस लागवडीसाठी...

  • शेत बांधणीचा खर्च : एकरी साडेचार ते पाच हजार रुपये

  • ऊस बेणे दर : एकरी पाच ते सहा हजार रुपये प्रति गुंठा

धरणातील पाणीसाठा

  • उजनीतील 11 जुलैचा एकूण पाणीसाठा : 1682 द.ल.घ.मी.

नीरा खोऱ्यातील धरणांतील 11 जुलैचा पाणीसाठा

  • धरण : 11/7/2021 : 11/7/2020

  • भाटघर : 4.39 टीएमसी : 18.67 टक्केवारी : 7.08 टीएमसी : 30.12 टक्केवारी

  • वीर : 3.92 टीएमसी : 41.64 टक्केवारी : 3.64 टीएमसी : 38.69 टक्केवारी

  • नीरादेवधर : 2.80 टीएमसी : 23.88 टक्केवारी : 1.69 टीएमसी : 14.39 टक्केवारी

  • गुंजवणी : 1.40 टीएमसी : 37.80 टक्केवारी : 1.52 टीएमसी : 41.19 टक्केवारी

  • एकूण : 12.51 टीएमसी : 25.88 टक्केवारी : 13.93 टीएमसी : 28.82 टक्केवारी

loading image