मालमत्ता कर न भरणाऱ्यांना दोन टक्‍के दंड! कर सवलतीसाठी आज शेवटची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता कर न भरणाऱ्यांना दोन टक्‍के दंड! कर सवलतीसाठी आज शेवटची मुदत

चालू मिळकत कर भरून सवलत घेण्याची आज (मंगळवार) शेवटची मुदत असणार आहे.

मालमत्ता कर न भरणाऱ्यांना दोन टक्‍के दंड! कर सवलतीसाठी आज शेवटची मुदत

सोलापूर : चालू मिळकत कर (Income tax) भरून सवलत घेण्याची आज (मंगळवार) शेवटची मुदत असणार आहे. रोखीने कर भरणाऱ्या मिळकतदारांना पाच टक्‍के तर ऑनलाइन कर भरणा करणाऱ्यांना सहा टक्‍के सूट दिली जाईल, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्‍त श्रीराम पवार (Shriram Pawar) यांनी दिली. सवलत देऊनही कर न भरणाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून एकूण मिळकत करावर (Property Tax) दोन टक्‍के शास्ती लावली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: शिक्षकांना आता डेंग्यू सर्व्हेची ड्यूटी! दररोज 150 घरांचे टार्गेट

कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. तिजोरीत पैसा नसल्याने जीएसटी अनुदानावर महापालिकेचा गाडा सध्या सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर अत्यावश्‍यक खर्च करण्यासाठीदेखील पैसे नाहीत, अशी आर्थिक स्थिती झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मालमत्ता कर विभागाने मिळकतदारांना कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात दोन टक्‍के सूट तर पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना करात तीन टक्‍के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पारंपरिक विजेचा वापर न करता सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या मिळकतदारांना करात पाच टक्‍के सूट दिली जाणार आहे. आतापर्यंत सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या 16 मिळकतदारांना, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेल्या 49 मिळकतदारांना आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर केलेल्या चार मिळकतदारांना करात सवलत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कुरनूर धरणाने गाठली शंभरी! तीन दरवाजांतून 200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

महापालिकेवरील दायित्व वाढले

शहर व हद्दवाढमधील नगरसेवकांना भांडवली निधी दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भांडवली कामाचा धडाका सुरू आहे. तत्पूर्वी, भांडवली कामे केलेल्या मक्‍तेदाराचे 60 कोटींपेक्षा अधिक रक्‍कम महापालिकेला द्यायची आहे. आता नव्याने होणाऱ्या कामांचेही पैसे आगामी काळात महापालिकेला द्यावे लागणार आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत महापालिकेला उद्दिष्टानुसार कर मिळालेला नाही. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येईल, या भीतीने अनेक मिळकतदार कर भरत नसल्याचे चित्र आहे. तरीही, नागरिकांनी त्यांच्याकडील मिळकत वेळेत भरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate
loading image
go to top