युवकांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? 'या' आहेत प्रशासकीय व इतर क्षेत्रातील संधी अन्‌ काही टिप्सही 

competitive exam
competitive exam

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : गेल्या काही दशकात केंद्रीय स्पर्धा परीक्षा क्षेत्रात (UPSC, SSC, Railway , NTPC, Banking) क्त उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची मक्तेदारी होती. परंतु अलीकडच्या काळात ही मक्तेदारी मोडून काढत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत दिल्लीचे तख्त गाजवले आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधींबद्दल ग्रामीण भागात होत असलेली जनजागृती, नागरी सेवेच्या माध्यमातून मिळणारी पदे, प्रतिष्ठा तसेच विविध आव्हाने झेलत समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, इंटरनेट व त्यांच्याशी संलग्न अनुप्रयोगाच्या माध्यमातून भौतिक अडथळे दूर होऊन दिल्ली, पुणेमधील दर्जेदार अभ्यास साहित्याची उपलब्धता; तसेच प्रशासकीय सेवेमध्ये मिळणारी प्रतिष्ठा, त्याभोवती असणारे आकर्षण, त्यायोगे मिळणारी समाजप्रतिष्ठा व नवोदित अधिकारी मंडळींनी वास्तवाशी गल्लत करत आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेली एकांगी यशोगाथा आदी गोष्टींमुळे गेल्या काही दशकात ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आकृष्ट झाले आहेत आणि ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब आहे. 

प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आपल्याला देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि वयोमान 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते. विद्यापीठीय परीक्षेतील टक्केवारी, आयुष्याच्या शैक्षणिक वाटचालीत दुर्दैवाने आलेली अपयशे, ग्रेड यापैकी कशामुळेही तुम्ही अधिकारी होण्यापासून वंचित राहू शकत नाही. आयएएस, आयपीएस, आयआरएस या पदांना प्राप्त असणाऱ्या वलयामुळे केंद्रीय नागरी सेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांपैकी नागरी सेवा परीक्षेकडे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. तसेच उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार आदी पदांभोवती असणाऱ्या वलयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांपैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांचा ओढा हा राज्य सेवा परीक्षेकडे असतो. 

परंतु, बहुसंख्य विद्यार्थी हे आयएएस तसेच उपजिल्हाधिकारी पदाव्यतिरिक्त पण भरपूर संधी उपलब्ध आहेत, याबाबत अनभिज्ञ असतात आणि त्यामुळे ते विद्यार्थी इतर संधींना मुकण्याची शक्‍यता असते. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नेमक्‍या कोणकोणत्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात, हे पाहणे देखील गरजेचे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी Civil Services Examination चे आयोजन करते. यामधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस), भारतीय वित्त व लेखा सेवा (आयए ऍण्ड एस), भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस), भारतीय माहिती सेवा (आयआयएस), सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या सेवा, भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएस) अशा विविध 26 सेवांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाते. 

Civil Service Exam सोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) Indian Forest Service; Indian Economic & Indian Statistical service; Combined Defence service; Combined Medical Service Examination; National defence academy & Naval academy examination; Combined Geo Scientists & geologist exam आदी परीक्षांचे वर्षभर आयोजन करत असते. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त, सहायक विक्रीकर आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, कक्षाधिकारी (मंत्रालय), गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेखा, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नायब तहसीलदार यासह अन्य विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. तसेच राज्य लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र वनसेवा परीक्षा; Combined Group B (PSI, STI, ASO) परीक्षा; Combined Group C (Excise sub inspector; लिपिक टंकलेखक; कर सहाय्यक); Maharashtra Engineering Services; Assistant Motor Vehicle Exam आदी विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. 

आपण कोणत्याही नोकरीची निवड करताना सामान्यपणे कोणते निकष लावायला हवेत याचे बारकाईने विश्‍लेषण केल्यास उत्तम वेतन, सामाजिक प्रतिष्ठा, अंगभूत गुणांना वाव, आर्थिक व सामाजिक स्थैर्य, अधिकार हे निकष समोर येतील. याशिवाय देशसेवा, समाजकार्य करण्याची इच्छा, सामाजिक उत्तरदायित्वे या गोष्टींचाही समावेश निकषांमध्ये समावेश होतो. भारतीय प्रशासकीय सेवा किंवा महाराष्ट्र लोकसेवा या बहुतांशी निकष पूर्ण करतात आणि त्यामुळेच करिअरचा एक अत्यंत उत्तम पर्याय म्हणून विद्यार्थी तसेच पालकही स्पर्धा परीक्षा क्षेत्राची निवड करतात, ही अतिशय चांगली बाब आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे केवळ शासकीय नोकरी, सरकारी बंगला, लाल दिव्याची गाडी, सामाजिक प्रतिष्ठा यांचेच नुसते आकर्षण असून चालणार नाही तर नेमके काय साध्य करायचे आहे, याविषयी स्पष्टता असणे फार आवश्‍यक आहे. कारण, आजही असे अनेक उमेदवार भेटतात ज्यांना आयएएस-आयपीएस व्हायचे असते, त्यासाठी यूपीएससीचे प्रयत्नसुद्धा सुरू असतात; पण एमपीएससीच्या विविध परीक्षांबाबत त्यांच्यात पूर्ण निरुत्साह दिसून येतो. 

बऱ्याचदा या परीक्षांबाबत त्यांना नीटशी माहितीसुद्धा नसते, असे निदर्शनास येते. पीएसआय / एसटीआयसारख्या परीक्षांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही, मी फक्त यूपीएससी करतो, अशा थाटामध्ये वावरणारा एक वर्ग आहे. तर एमपीएससीच्या परीक्षेतून एखादे छोटे-मोठे पद मिळाले की पुरे झाले! यूपीएससीचे नंतर बघता येईल किंवा माझं ध्येय फौजदार होणे, इतर परीक्षांमध्ये मला स्वारस्य नाही' असे म्हणणारे उमेदवारही आहेत. याचे कारण असे आहे की, शहरी, निमशहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत आताच्या शिकत असणाऱ्या आणि शिकून झालेल्या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षा पास झालेल्या, अधिकारी झालेल्यांची भाषणं मोठ्या प्रमाणात घडवून आणली गेली. मुळात अधिकारी पदावरून लोकसेवेच्या कार्याची सुरवातच शून्य असताना आपल्या जीवनाचा प्रवास (स्पर्धा परीक्षा पास होईपर्यंतचा) किती खडतर होता, हे रंगवून सांगणारी अर्धवट चरित्रं पुस्तकांच्या रूपानं बाजारात पोचली. त्यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय आणि शेवटी यश या सर्व गोष्टी केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात, असा बडेजावपणा आणून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा इतक्‍या मोठ्या प्रमाणात फुगवल्या गेल्या की, शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होणाऱ्या तरुण-तरुणींची लाट स्पर्धा परीक्षांकडे वळू लागली. महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गैर नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्‍यक आहे. 

तसेच स्पर्धा परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांची परीक्षा नसून ती पालकांचीही परीक्षा असते. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्याही संयम, जिद्द व चिकाटीवृत्तीची कसोटी लागते. परंतु एक आणि एकाच पदावर किंवा परीक्षेवर अडून राहिल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्‍यता असते. दोन/ तीन प्रयत्न संपले तरी तीन-चार वर्षांचा अवधी हातातून निसटलेला असतो. अशावेळी युवकांच्या हाती नैराश्‍याशिवाय काही पर्याय उरत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्यापूर्वी उमेदवाराला या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधी तसेच तिथंपर्यंत पोचण्यासाठीची आव्हाने याबाबतीत परिपूर्ण माहिती हवी. तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आपण किती वेळा प्रयत्न करणार आहोत आणि समजा अथक परिश्रम करूनही आपणास या क्षेत्रात अपयश आलेच तर नैराश्‍याच्या गर्तेत जाण्याऐवजी आपल्याकडे उपजीविकेसाठीची दुसरी योजना तयार हवी. 

आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात मार्गक्रमण करताना सर्वांनी वास्तविक बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारत आपल्याला कुठंपर्यंत प्रयत्न करायचे आहेत; कुठे थांबायचे आहे व थांबल्यावर निराश होऊन नैराश्‍याच्या गर्तेत न जाता दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात श्रीगणेशा करायचा आहे याचे नियोजन हवे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध असल्या तरी या क्षेत्रात दुर्दैवाने अपयश आल्यास खचून न जाता सर्वांनी एवढे लक्षात ठेवायला हवे, की स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र नाही. तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्राची तयारी करताना प्राप्त झालेले ज्ञान, वैचारिक प्रगल्भता, संयमीपणा, तर्कनिष्ठ बोलणे, अनुभव आदी गोष्टींच्या जोरावर आपण इतरही क्षेत्रात देदिप्यमान यश संपादन करू शकतो. 

कोणत्याही क्षेत्रात जात असताना ठेवा पर्यायी दुसरा मार्ग तयार
यूपीएससी असो अथवा एमपीएससी करताना विद्यार्थ्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे. मनापासून जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात प्रयत्न करत राहावे. प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते. स्पर्धा परीक्षा करण्यासाठी चार ते पाच वर्षांचा देखील कालावधी लागू शकतो. एवढा दिवस, वेळ आपल्याकडे अभ्यास करण्याची क्षमता आहे का हेही विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे. स्पर्धा परीक्षा करत असताना सतत अपयश येत असल्यास विद्यार्थ्यांनी निराश न होता इतर चांगल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही क्षेत्रात जात असताना पर्यायी दुसरा मार्ग तयार ठेवावा. 
- श्रीकांत खांडेकर 
प्रशिक्षणार्थी आयएएस (2020) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com