Tourism Day Special : हौशी सर्वसामान्य पर्यटकांना आधार ‘लालपरी’चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism Day Special

Tourism Day Special : हौशी सर्वसामान्य पर्यटकांना आधार ‘लालपरी’चा

सोलापूर : पुणे, मुंबईसह सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य पर्यटकांना कमी पैशांत तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर व सोलापूर शहर येथील तिर्थक्षेत्रांना नेण्यासाठी लालपरीची स्वतंत्र व्यवस्था आहे.

सोलापूरहून अक्कलकोट, गाणगापूरला जाऊन येण्यासाठी साधारणत: २८० रुपये तर तुळजापूरला १३० आणि पंढरपूरला २२० रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे विभाग नियंत्रक सांगतात.

मुंबई, कोकण, पुण्यातून रेल्वेने अनेक पर्यटक, भाविक सोलापुरात येतात. त्यानंतर ते राज्य परिवहन महांडळाच्या लालपरीतून तिर्थक्षेत्रांना जातात. त्यांच्यासाठी सोलापूर दर्शन, अक्कलकोट, गाणगापूर दर्शन, तुळजापूर व पंढरपूर दर्शन अशा बसगाड्यांची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. दररोज त्या गाड्या संबंधित ठिकाणी ये-जा करतात. साधी, निमआराम, शिवशाही अशा बसगाड्यांचे तिकीट दर वेगवेगळे आहेत.

दर आठवड्याच्या गुरुवारी अक्कलोट, गाणगापूर दर्शन बसला पर्यटक तथा भाविकांची गर्दी असते, अशी माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली. सोलापूर शहरातील हॉटेल तथा लॉजवर राहण्याचा खर्चदेखील पुणे, मुंबईच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुण्यातील पर्यटक रेल्वेने सोलापूर शहरात येतात. दोन दिवसांत तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन पुन्हा रेल्वेने परत जातात, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण तरुणांना गोवा, गणपतीपुळ्याचे आकर्षण

सुटीत किंवा खास सुट्टी काढून गावातील सर्वसामान्य तरूण गावातील खासगी वाहनाने किंवा एसटी बसने वर्षातून किमान एकदा तरी पर्यटनासाठी जातातच. तीन ते पाच हजार रुपयांच्या खर्चात ते गोवा, गणपतीपुळे व कोकण दर्शन करून त्याच वाहनाने परत येतात. दररोजच्या कामाच्या व्यापातून आनंद मिळावा म्हणून ते पर्यटन करतात. सांघिक पध्दतीने तरूण एकत्रित गेल्याने खर्चही कमी लागतो आणि ‘गुगल मॅप’वरून ते प्रवास करतात.

खासगी प्रवास भाड्याच्या तुलनेत एसटी महामंडळाच्या गाड्यांचे दर माफक आहेत. सर्वसामान्यांसाठी लालपरीचा मोठा आधार असून पर्यटकांसाठी दर्शन बसची व्यवस्था आहे. मुंबई, पालघर, कोकण, पुणे येथून अनेक पर्यटक एसटीनेच प्रवास करतात.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर बस आगार