त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

अक्कलकोट (सोलापूर) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुदेव दत्तात्रयांचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाणारे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर,श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे मोठी गर्दी झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषाने अवघी अक्कलकोट नगरी दुमदुमली. राज्यासह परराज्यातून असंख्य पालख्या,दिंड्या आज त्रिपुरारी पौर्णिमेच्यानिमित्ताने अक्कलकोट नगरीत आलेल्या होत्या. संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते.

हेही वाचा: बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र या राज्यातून असंख्य भाविक गेल्या दोन दिवसापासून शहरात दर्शन घेण्यासाठी येत आहेत. तसेच पुढील दोन दिवस सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती झाली. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे,मुख्य पुरोहित मोहन गुरुजी,मंदार पुजारी,व्यंकटेश पुजारी आदी उपस्थित होते. काकड आरतीनंतर पहाटेपासून भक्तांना दक्षिण महाद्वारातून दर्शनासाठी सोडण्यात येत होते. कोविड-19 च्या नियमावलीचे पालन याप्रसंगी करण्यात येत होते. दर्शनानंतर भक्तांना पूर्व दिशेच्या द्वारातून बाहेर सोडण्यात येत होते. भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,सचिव आत्माराम घाटगे,विश्वस्त महेश गोगी,श्रीशैल गवंडी,गिरीश पवार,संजय पवार,प्रसाद सोनार,ऋषी लोणारी,पप्पू शिंदे,सागर गोंडाळ आदी प्रयत्नशील होते.

बसस्थानक परिसरातील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठ रंगबिरंगी फुलांनी व विद्युतरोषणाई करून आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. पहाटे पाचपासून समाधीमठात दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त चोळप्पा महाराजांचे वंशज असलेले सर्व पुजारी भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्नशील होते.

हेही वाचा: ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून येत्या दोन-तीन दिवसातसुद्धा असंख्य भक्त दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने चोख बंदोबस्त ठेवलेला होता. स्वतः पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,एपीआय महेश भावीकट्टी,धनराज शिंदे आदींनी चोख बंदोबस्ताची पाहणी केली. एसटीच्या संपाचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसला असून ते आज दर्शन घेऊ शकले नाहीत.खाजगी चारचाकी वाहने मात्र मोठ्या प्रमाणात अक्कलकोटला आल्याचे दिसत होते. बऱ्याच कालावधीनंतर धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने भक्तांच्या गर्दीने बहरलेली दिसत होती. कोविड व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रथमच भक्तांची मोठी गर्दी दर्शनासाठी झाली.

loading image
go to top