हे आहेत भाजपचे दोन देशमुख, एकत्र येतात अन्‌ विरोधात लढतात! | Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हे आहेत भाजपचे दोन देशमुख, एकत्र येतात अन्‌ विरोधात लढतात!
हे आहेत भाजपचे दोन देशमुख, एकत्र येतात अन्‌ विरोधात लढतात!

हे आहेत भाजपचे दोन देशमुख, एकत्र येतात अन्‌ विरोधात लढतात!

सोलापूर : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय मतभेद विसरून नेत्यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सर्वपक्षीयांकडून होत असतात. मात्र, नेहमीच निवडणुकीपूर्वी एकत्र येणे अन्‌ विरोधात लढणे अशा भूमिकेत असलेल्या भाजपच्या सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) या दोन्ही आमदारांनी एकत्र बैठक घेतली. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा तर पक्षाला शुभसंकेत मिळल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

गेल्या पाच वर्षात झालेल्या या दोन देशमुखांच्या गटबाजीची किमया सातासमुद्रापार गेली आहे. आतापर्यंत झालेल्या महापालिका, विधानसभा, लोकसभा, बाजार समिती, महापालिकेतील पदाधिकारी निवडणुकीत भाजपच्या दोन्ही देशमुखांमध्ये झालेला टोकाचा संघर्ष सोलापूरकरांनी पाहिला. आता महापालिका निवडणुकीसाठी दोघांनी एकत्र येऊन घेतलेली बैठक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही देशमुख एकत्र येऊन चर्चा करण्याचे अनेक किस्सेही रंगले आहेत. गत महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही देशमुखांनी एकाच व्यासपीठावरून पक्षाचा प्रचार केला अन्‌ नरेंद्र काळे व नागेश वल्याळ यांच्या उमेदवारीसाठी दोन्ही देशमुखांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली ताकद पणाला लावली होती. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीपूर्वी मतभेद बाजूला सारून एका व्यासपीठावर आले.

निवडणुकीच्या रिंगणात दोघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधक राहिले बाजूला अन्‌ या दोन देशमुखांची जंग शेतकऱ्यांनी जवळून पाहिली. विरोधी पक्षातील संचालकांच्या सहकार्याने प्रथमच आमदार विजयकुमार देशमुखांनी बाजार समितीवर भाजपचा झेंडा रोवला. लोकसभा निवडणुकीत देखील निवडणुकीपूर्वी एकाच मंचावर, एकमेकांशी संवाद साधताना दिसलेले दोन्ही देशमुख आपल्या मर्जीतील व्यक्‍तीला उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच करताना दिसले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्यासाठी तर आमदार सुभाष देशमुख यांनी अमर साबळे यांच्या उमेदवारीसाठी दिल्ली वारी केली. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने या गटबाजीला चांगलेच खतपाणी मिळत गेले.

हेही वाचा: कायदा-राजकारणात मोहिते-पाटलांचा चाणाक्षपणा! NCP मात्र गाफील

सकारात्मक ऊर्जा मिळण्याचे संकेत

आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख हे निवडणुकीपूर्वी एकत्र येतात अन्‌ पुन्हा विरोधात लढतात, अशीच प्रतिमा भाजपच्या या दोन्ही देशमुखांबद्दल बनली आहे. परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांविरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. त्यातच राज्यातील सत्ताही पलटली आहे. याचा परिणाम या स्थानिक पातळीवरील निवडणुकीत दिसणार आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ होऊ नये, यासाठी शहराध्यक्षांनी दोन देशमुखांना एकत्र आणून बैठक लावली. या बैठकीत महापालिकेची रणनीती ठरविण्यासाठी दोन्ही आमदार देशमुखांनी एकत्र येऊन चर्चा केल्याने पक्षाला सकारात्मक ऊर्जा मिळण्याचे संकेत आहेत.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top