कर वसुलीसाठी पंढरपूर नगरपालिकेचा अनोखा फंडा
कर वसुलीसाठी पंढरपूर नगरपालिकेचा अनोखा फंडा Sakal

Pandharpur News : कर वसुलीसाठी पंढरपूर नगरपालिकेचा अनोखा फंडा

आपले नाव वृत्तपत्रांमध्ये कर थकबाकीदार म्हणून जाहीर होणे अपेक्षित आहे का? अशा आशयाचे फलक पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकामध्ये लावण्यात आले आहेत.

पंढरपूर : आपले नाव वृत्तपत्रांमध्ये कर थकबाकीदार म्हणून जाहीर होणे अपेक्षित आहे का? अशा आशयाचे फलक पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकामध्ये लावण्यात आले आहेत. कर वसुलीसाठी केलेल्या या अभिनव उपक्रमाद्वारे लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्डचे फलक पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने ३१ मार्चपूर्वी घरपट्टी, नळपट्टी व गाळा भाडे आदी १०० टक्के कर वसूल करण्यासाठी वसुली मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व कर अधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने ८ करवसुली पथके तैनात केली आहेत.

यासह पालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी पालिकेच्या वाहनातून शहरात फिरून ध्वनिक्षेपकावरून कर भरण्याच्या उद्घोषणा देत आहेत. तर काही कर्मचारी कर थकबाकीदार नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मुदती आधी कर भरण्याचे आवाहन करीत आहेत. याशिवाय शहरातील मोक्याच्या ठिकाणी नगरपालिकेची व्यापारी संकुले आहेत.

या व्यापारी संकुलातील शेकडो गाळेधारकांना देखील गाळाभाडे भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील बहुतांश नागरिक या आवाहनास प्रतिसाद देत पालिकेचा कर भरणा करीत आहेत. मात्र काही नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याने अशा नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी पालिकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

या उपक्रमांतर्गत नगर पंढरपूर नगरपालिकेने शहरातील १० प्रमुख चौकांमध्ये कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे फ्लेक्स बोर्डचे फलक लावले आहेत. या फलकावर 'आपले नाव कर थकबाकीदार म्हणून वृत्तपत्रांमध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे का? हा कटू प्रसंग टाळण्यासाठी नगरपरिषदेची चालू व थकीत घरपट्टी नळपट्टी व गाळा भाडे ताबडतोब भरा' असे नागरिकांना आवाहन करणारा मजकूर आहे.

कर वसुलीसाठी केलेल्या अशा विविध उपक्रमाद्वारे पंढरपूर नगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये एकूण १३ कोटी ५७ लाख ९ हजार ३२० रुपये कर रक्कमपैकी ८ कोटी ४२ लाख ३८ हजार ८५७ रुपये कर वसूल केला आहे. म्हणजे अद्यापपर्यंत ६२% कर वसूल झाला आहे. ३१ मार्च पूर्वी १०० टक्के कर वसूल करण्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी ' सकाळ ' शी बोलताना दिली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहरातील विविध विकास योजनांसाठी नगरपालिकांना कर वसुलीच्या टक्केवारीवर आधारित अनुदान दिले जाते. मात्र पालिका जेवढे टक्के कर वसूल करते तेवढे टक्केच अनुदान त्या पालिकेस दिले जाते. त्यामुळे शहराच्या विकास कामांसाठी जास्तीत जास्त अनुदान मिळावे याकरिता सर्व नागरिकांनी तातडीने आपला कर भरावा.

- डॉ.प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com