विद्यापीठाने बदलला परीक्षा शुल्काचा निर्णय ! परीक्षा अर्जासाठी आता सुपर लेट फी 

0.jpg
0.jpg

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने नुकतच्या झालेल्या तथा पुढील परीक्षेसाठी अर्ज न केलेल्यांसाठी 28 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय गुरुवारी (ता. 26) घेतला. त्यानुसार डिसेंबरमध्ये परीक्षा घेतली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले. मात्र, पुढील चार दिवसांतच आपलाच निर्णय बदलत विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना परीक्षा कधीपासून होईल हे स्पष्टपणे न सांगता मुदतीत अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुपर लेट फी आकारण्याचा निर्णय घेतला.

ठळक बाबी... 

  • परीक्षा न दिलेल्यांसाठी 28 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत 
  • विद्यापीठाने परीक्षेसाठी नव्याने अर्ज केलेल्यांची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरविले होते 
  • 31 ऑक्‍टोबरच्या निर्णयानुसार विद्यापीठाने मुदतीत अर्ज न करणाऱ्यांसाठी आकारली सुपर लेट फी 
  • नव्या निर्णयानुसार परीक्षा कधीपासून घेतली जाणार, याचा उल्लेख विद्यापीठाने टाळला 

कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्याने आणि या महिन्यात बॅकलॉग विद्यार्थ्यांचीही परीक्षा ऑनलाईनच घेतली जाणार आहे. उत्तरपत्रिका, प्रश्‍नपत्रिका छपाईसह पर्यवेक्षकांवरील खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अन्य विद्यार्थी संघटनांनी केली आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नसून विद्यापीठ हे विद्यार्थीकेंद्रीत, विद्यार्थीहिताचे असल्याची बतावणी प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, चार दिवसांत निर्णय बदलून लॉकडाउन काळात अडचणीत सापडलेल्या गोरगरिब विद्यार्थ्यांना पुन्हा पेचात टाकले आहे. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेसाठी अर्ज करु न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता 3 नोव्हेंबरनंतर सुपर लेट फी देऊन अर्ज करावा लागणार आहे.


1 नोव्हेंबरची परीक्षा आता 6 नोव्हेंबरपासून
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासंदर्भाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रथम वर्ष बॅकलॉगच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एल.एल.बी. सत्र एक व दोन, बी. ए. एल. एल. बी. सत्र एक ते सहा तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमात एफई व एसई (CBCS) भाग एक व दोन, टीई (CGPA) भाग एक व दोनच्या तसेच बी-टेक व आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमाच्या सत्र एक ते सहाच्या परीक्षा 1 नोव्हेंबरऐवजी 6 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com